रत्नागिरी : येत्या ११ डिसेंबरला जपानचे पंतप्रधान शिंजो अबे हे भारत दौऱ्यावर येणार आहेत़ यावेळी भारत-जपान अणुव्यापार करार करण्यात येणार आहे़ या कराराचा संबंध राजापूर तालुक्यातील प्रस्तावित जैतापूर प्रकल्प उभारणीसाठी महत्त्वाचा ठरतो़ याला विरोध करण्यासाठी साखरीनाटे - माडबन प्रकल्पस्थळी १२ डिसेंबर रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जनहक्क सेवा समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली़यावेळी मच्छिमार नेते अमजद बोरकर, डॉ़ मंगेश सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला येथील ग्रामस्थांचा अजूनही तीव्र विरोध आहे. फ्रेंच कंपनी अरेवा हिला जपानची मित्सुबिशी कंपनी काही महत्त्वाची उपकरणे पुरविते़ भारत-जपान अणुकरार होत नाही़, तोपर्यंत ही उपकरणे व तंत्रज्ञान भारतात येऊ शकत नाही़ राजकोटमधील वेस्टिंग हाऊस आणि आंध्रप्रदेशमधील कुव्वाडा येथील अमेरिकन कंपन्यांचे अणु प्रकल्पाचे भवितव्यही या करारावर अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, ११ ते १३ डिसेंबर या कालावधीसाठी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे हे भारत दौऱ्यावर येत आहेत़ या दौऱ्यादरम्यान भारत-जपान अणुव्यापार करार करण्यात येणार आहे़ या कराराचा संबंध जैतापूर प्रकल्प अणु कंपन्यांच्या भ्रष्ट लॉबीला आणि सरकार देत असलेल्या या कंपन्यांच्या पाठिंब्याला विरोध करण्यासाठीच जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे़ या आंदोलनाला शिवसेनेचे आमदार राजन साळवी व शिवसेना पक्षाचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाविरोधात जैतापूर परिसरातील ग्रामपंचायतींनी ठराव करून रणशिंग फुंकले आहे़ स्थानिकांच्या वाढत्या विरोधाची ही पावतीच आहे़ आतापर्यंत १३ ग्रामसभांनी प्रकल्पविरोधात ठराव केले असून, हे लोण आता संपूर्ण जिल्ह्यात पसरत असल्याचे मच्छिमार नेते अमजद बोरकर यांनी सांगितले़ अणुऊर्जा प्रकल्पाला एकीकडे विरोध आहे. तर प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या जमिनींचा मोबदला देण्याचे काम सुरू आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी हा मोबदलादेखील स्वीकारला आहे. त्यामुळे या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो, हे महत्वाचे आहे. (शहर वार्ताहर)हिवाळी अधिवेशनामध्ये जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात विधान सभेत आवाज उठविण्यासाठी शिवसेनेला सांगण्यात येणार असल्याचे अमजद बोरकर यांनी सांगतानाच या आंदोलना शिवसेनेचा यापुढेही पाठींबा राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रकल्पाविरोधात १२ रोजी जेलभरो
By admin | Updated: December 3, 2015 23:49 IST