रत्नागिरी : जयगड नळपाणी योजनेंतर्गत कळझोंडी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे पाणीपट्टी वार्षिक ३६० वरुन २४०० रुपयापर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे या भागातील ग्राहकांना सहापटीने वाढणाऱ्या पाणीपट्टीचा सामना करावा लागणार आहे.वाटद जिल्हा परिषद गटामध्ये कार्यान्वित असलेली जयगड प्रादेशिक नळपाणी योजना परिसर अभियांत्रिकी विभागाकडून सन १९८० ते १९८५ या कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आली. या योजनेत १३ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील २६ महसुली गावे व १८५ वाड्या अंतर्भूत आहेत. ही योजना १९९० पासून पाणीपुरवठा व देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने ताब्यात घेतली आहे. सन २००६ सालच्या प्रस्तावित २९२५०० लोकसंख्येसाठी ४० लीटर प्रतिमाणसी प्रतिदिन याप्रमाणे १.१७ एमएलडीशिवाय जयगड परिसरातील पर्यटनासाठी ०.१६ एमएलडी असे एकूण १.३३ एमएलडी पाणी पुरवठा करत आहे. परंतु प्रत्यक्षात १.७० एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येतो.या योजनेतून वाहून जाणाऱ्या पाण्याचे नियोजन केल्यास राखीव असलेल्या साठ्यातील पाणी पर्यटनासाठी देण्याचे व बाजूला टंचाईग्रस्त असलेल्या गडनरळ गावाला देण्याचा ठराव जिल्हा परिषदेने केला होता. लोडशेडिंग, पंपाची क्षमता, साठवण टाकीची क्षमता, नादुरुस्त पाईपलाईन, अपुरा कर्मचारीवर्ग या तांत्रिक बाबींचा विचार करता ओमकार प्रॉपर्टी, मालगुंड येथे दिले जाणारे पाणी बंद करण्यात आले. मात्र, गडनरळ गावासाठी कळझोंडी गावाच्या टाकीपर्यंत पाणीपुरवठा सुरु आहे. १९८५ साली पूर्ण झालेल्या या कळझोंडी धरणाच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. वाहून जाणारे पाणी दुसरा पंप लावून पुन्हा धरणात टाकावे लागत आहे. या धरणाची उंची वाढवण्याचा विचार आहे. परंतु ज्या धरणाचा पायाच मजबूत नाही, त्याची उंची वाढवणे धोक्याचे आहे. या धरणाच्या खाली वरवडे गाव आहे. उंची वाढवून पाणीसाठा करण्याचा प्रयत्न झाल्यास माळीणसारखी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. धरणाची उंची न वाढवता दुरुस्त करुन गाळ काढल्यास कितीतरी पटीने पाणीसाठा वाढू शकतो. सुकाणू समिती स्थापनेसाठी पालकमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जीवन प्रादेशिकने परिसरातील सरपंचांची बैठक घेतल्याचे सांगण्यात येते. या बैठकीत धरणाची उंची, साठवण टाकी आदी दुरुस्ती करुन दिल्यानंतर २४०० रुपये प्रतिवर्षी पाणीपट्टी भरण्याचा ग्रामपंचायतीने ठराव घ्यावा, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
जयगड योजनेचे पाणी महागणार
By admin | Updated: August 17, 2014 00:40 IST