शिवाजी गोरे ल्ल दापोलीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली काँग्रेस संघटनेमध्ये महत्त्वाचे फेरबदल करण्यात येत आहेत. व्होट बँकेवर डोळा ठेऊन शिवसेनेने विधानसभा क्षेत्राध्यक्षपदी संदीप राजपुरे व तालुका प्रमुखपदी शांताराम पवार यांची निवड केल्यानंतर काँग्रेसनेही त्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, काँग्रेसला अध्यक्ष मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळेच विद्यमान तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर महिना उलटून गेल्यानंतरही तो मंजूर केला जात नाही, अशी चर्चा सुरु आहे. दापोलीत गेल्या दहा वर्षांत काँग्रेसने नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. पूर्वी या भागातून भाई जगताप उभे राहायचे. आता या ठिकाणी नवे नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. माजी आमदार चंद्रकांत मोकल, अॅड. वसंत मेहेंदळे, मधुकर दळवी, रमेश जाधव, अॅड. विकास मेहता यांनी प्रयत्न केले असले तरी पक्षाला बळकटी प्राप्त झाली असे म्हणता येत नाही. याशिवाय बाळ बेलोसे, भाऊ मोहिते यांनी प्रयत्न सुरु ठेवले असले तरी गटातटाच्या राजकारणात तालुकाध्यक्षपदापासून हे दोघेही बाजूला राहिले. ऐनवेळी भाऊ मोहिते यांच्या तोंडचा घास काढला गेला. रमेश जाधव यांनी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर रिक्त झालेल्या पदासाठी अद्याप शोधाशोध सुरुच आहे. त्यावेळी विकास मेहता यांची वर्णी लागली. मात्र, गटातटाचे राजकारण पुन्हा उफाळून आले. लोकसभा निवडणुकीत हे वाद चव्हाट्यावर आले होते. निवडणूक निकालानंतर मेहता यांनी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, त्यानंतर आजपर्यंत या पदावर अद्याप अध्यक्ष नेमण्यात आलेला नाही. या पदावर नक्की कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.
दापोलीत काँग्रेसला सक्षम तालुकाध्यक्ष मिळणे कठीण
By admin | Updated: July 8, 2014 00:21 IST