चिपळूण : चिपळूण तालुक्यातील कुटरे चिंचवाडी होडेवाडी येथील ‘राष्ट्रीय पेयजल योजने’च्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, २८ लाख २३ हजार ६२६ रुपयांचे अंदाजपत्रक बनविले असून, प्रत्यक्षात १० लाखांचंहीे काम झालेले नाही. त्यामुळे या योजनेच्या कामाची चौकशी करावी, अन्यथा दि.२६ जानेवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा कुटरेच्या ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा मोलक यांनी पत्रकार परिषदेत दिला. सुमारे १ वर्षापासून कुटरे चिंचवाडी होडेवाडी येथे पेयजल योजनेचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम चिपळूणचे शाखा अभियंता आर. सी. कांबळे यांच्या अधिपत्याखाली सुरु आहे. प्रत्यक्षात अंदाजपत्रक २८ लाख २३ हजार ६२६ रुपयांचे बनविले आहे. मात्र, प्रत्यक्षात १० लाखांचे कामही झालेले नाही. या योजनेच्या नुतनीकरणाचे काम असल्याने, शाखा अभियंता कांबळे यांनी जुनी पाईपलाईन या कामासाठी वापरात आणून, ती जमिनीवरुन टाकली आहे. ही पाईपलाईन डोंगरावरुन असल्यान,े डोंगर भागात वणवा लागल्यास जळून जाण्याची शक्यता आहे. पाईपलाईन खोदाईसाठी ४९ हजार ४७१ रुपयांची तरतूद असतानाही खोदाई केली जात नाही, याबाबत शाखा अभियंता कांबळे यांना सांगूनही ते लक्ष देत नाहीत. यापुढे जाऊन, त्यांनी ७ लाख रुपयांचे बिल दि.२२ डिसेंबर २०१३ रोजी ठेकेदाराच्या नावे काढले आहे. शाखा अभियंत्यांना वेळोवेळी सांगूनही, कामात काहीही बदल केला जात नाही. योजनेमध्ये आदिवासी समाजाची २३ कुटुंबे आहेत. यांच्यासाठी अद्याप पाईपलाईन टाकलेली नाही. चुकीच्या पद्धतीने काम चाललेले असताना शाखा अभियंता कांबळे यांनी ७ लाख रुपयांचे बिल ठेकेदाराला कसे काय अदा केले? सध्या हे काम बंद आहे. मग सुरु नसणाऱ्या कामाचे बिल कसे काय काढले जाते? या योजनेमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, याची चौकशी होणे गरजेचे आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे काम सुरु नसल्याने, या कामास मज्जाव केला असता, ठेकेदार मलमपट्टी करुन काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. योजनेचे काम कृष्णा महाडिक या ठेकेदाराच्या नावाने शाखा अभियंता कांबळे हेच करीत आहेत, असा आरोपही करून काम योग्य पद्धतीने न झाल्यास महिलांसह उपोषणास बसण्याचा इशारा मोलक यांनी दिला आहे. (वार्ताहर)अंदाजपत्रक व प्रत्यक्ष कामात तफावत कुटरे चिंचवाडी होडेवाडीसाठी शासनातर्फे यापूर्वी नळपाणी योजना राबविली होती. मात्र ग्रामस्थांनी वीज बिल थकविल्यामुळे ती बंद करण्यात आली. पाण्यावाचून ग्रामस्थांचे हाल व गैरसोय झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून, कुटरे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे बंद योजना चालू करण्याबाबत मागणी केली. अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून २८ लाख २३ हजार ६२६ रुपये किंमतीचे अंदाजपत्रक तयार केले. त्या अंदाजपत्रकाला मंजुरीही दिली. मात्र अंदाजपत्रक व प्रत्यक्ष कामात तफावत असल्याचा आरोप, सुवर्णा मोलक यांनी केला आहे.
चिंचवाडी-होडेवाडी पेयजलच्या कामात गैरव्यवहार
By admin | Updated: January 19, 2015 00:20 IST