लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथील ग्रामस्थांना धामापूर, देवरूख, पूर याठिकाणी लस घेण्यासाठी जावे लागत हाेते. त्यामुळे ग्रामस्थांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत हाेता. माळवाशी येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत उपसरपंच सुनील सावंत यांनी पाठपुरावा केला हाेता. सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, बुधवारपासून येथे लसीकरण सुरू करण्यात आले आहे़
या लसीकरणाच्या शुभारंभावेळी सरपंच वैजयंती करंडे, उपसरपंच सुनील सावंत, आरोग्य विभागाच्या धामापूर उपकेंद्राचे डाॅक्टर, ग्रामसेविका समिधा मोहिते, शिक्षक अरविंद वारे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व शिक्षक, ग्राम कृती दलाचे सदस्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कडू, आरोग्यसेविका धने उपस्थित होते. ग्रामस्थांनी लसीबाबत कोणताही गैरसमज न ठेवता, अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्यावी व ग्रामपंचायतीला तसेच यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच वैजयंती करंडे यांनी केले आहे. या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद वारे यांनी केले़
-----------------------
ग्रामस्थांचे लसीकरण पूर्ण व्हावे, यासाठी लसीकरण केंद्राची मान्यता मिळणे आवश्यक होते. परंतु, किचकट निकषांमुळे आणि लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाला मर्यादा येत होत्या. तालुका आरोग्य अधिकारी सोनावणे यांचे सहकार्य लाभले. ग्रामपंचायतीच्या बैठकीत याबाबत ठरावही केला होता़
- सुनील सावंत, उपसरपंच