रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोरा वाढू लागला आहे. गेल्या २४ तासांत एकूण ४४६.५० मिलीमीटर (सरासरी ४९.६१ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी काहीकाळ सूर्यदर्शन झाल्यानंतर पावसाचा जाेर वाढलेला होता. सायंकाळनंतर पाऊस अधिकच वाढला.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जाेर अधिकच वाढला आहे. ऐन गणेशोत्सवात मुसळधार पाऊस पडत असल्याने गणेशभक्तांचा विरस झाला आहे. सोमवारी सकाळी थोडा वेळ ऊन पडल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. दिवसभर सरींवर पाऊस असला तरी मोठ्या सरी कोसळत होत्या. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील शरीफा सयद तळघरकर यांच्या घराचे अंशत: १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद होती. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दरड हटविण्यात आली आहे.
पर्जन्यमानविषयक इशारा...
कुलाबा हवामान खात्याकडून आलेल्या संदेशानुसार, १३ ते १५ सप्टेंबर या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.