रत्नागिरी : हातखंबा व कारवांचीवाडी येथील निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर संस्थेत यंदाही कोरोना लसीकरणाचा संदेश देत गणरायाचे आगमन झाले आहे.
माहेर संस्थेमध्ये वर्षातील सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होत असतात. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री गणेशाचे आगमन झाले आहे. दरवर्षी गणेशोत्सवात एक सामाजिक संदेश दिला जातो. या वर्षीचा कोरोना प्रतिबंधासाठी कोरोना लसीकरणाचा सामाजिक संदेश संस्थेने दिला आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशाची सर्व सजावट संस्थेतील मुला-मुलींनी केली आहे. दररोज एक नवीन स्पर्धा घेऊन तसेच आरती व प्रसाद तयार करून दहा दिवस हा उत्सव साजरा केला जातो. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी पाच वर्षे एकच गणेशमूर्ती प्रतिष्ठापित केली जाते. गणेशाच्या आगमनामुळे निराधारांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झाला आहे.