रत्नागिरी : जिल्ह्यातील अनेक कोविड सेंटर्स रुग्ण नसल्याचे कारण देऊन बंद केली आहेत. याठिकाणी काम करणाऱ्या परिचारिकांना ठरलेला मोबदला दिला गेला नाही, अशी माहिती मिळत आहे. तसेच काही महागडी इंजेक्शन गरज नसतानाही मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाला आहे, हाही विषय गंभीर असल्याचे दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी म्हटले आहे. त्यामुळे इंजेक्शन खरेदी इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली असल्यास ती कशी झाली? याबाबतही चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संक्रमण प्रसाराची शक्यता अधिक आहे. परंतु, जिल्ह्यातील आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये घट, आरटीपीसीआर लॅबचे कामकाज बंद हे विषय खूप गंभीर आहेत. त्यामुळे आरटीपीसीआर लॅब पूर्ण क्षमतेने सुरू करावी, अशी मागणी ॲड. दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडे केली आहे. काही दिवस या लॅबमध्ये डाटा फिड करणारे कर्मचारी उपलब्ध नाहीत. चार कर्मचारी त्यांचा कामाचा मोबदला न मिळाल्यामुळे काम करण्यास येत नाहीत. आरोग्य प्रशासनाकडे ती व्यवस्था हाताळू शकेल, असे अन्य कर्मचारी नसावेत. आरटीपीसीआर स्वॅबचे अहवाल अन्य जिल्ह्यातून तपासून घेतले जातात, अशी माहिती मिळत आहे.
स्वाभाविकपणे या चाचण्यांचे प्रमाण खूप घटले आहे, ही गोष्ट खूप गंभीर आहे. या लॅबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना (कंत्राटी) मोबदला वेळीच देणे, ही जबाबदारी प्रशासनाची आहे. याप्रकरणी तत्काळ लक्ष घालून आरटीपीसीआर लॅब तत्काळ पूर्ण क्षमतेने सुरू करावी, अशी मागणी ॲड. पटवर्धन यांनी केली आहे.