रत्नागिरी : गतवर्षी कोरोनाकाळात आंबा वाहतुकीचा प्रश्न उभा राहिला असतानाच एस.टी. शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली होती. एप्रिलमध्ये आंबा वाहतूक करण्यात आली होती. यावर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत आंबा वाहतूक करण्याचा निर्णय रत्नागिरी विभागाने घेतला आहे. मात्र, आंबा उत्पादनच कमी असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
रत्नागिरी विभागाने थेट आंबा बागायतदार, व्यापाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडील आंबा वाहतूक करण्याचा निर्णय घेतला. आंबा वाहतुकीसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वाहतुकीची तयारी दर्शविली आहे. परंतु, आंबा कमी असल्याने मालवाहतुकीसाठी घाऊक पेट्या उपलब्ध होत नाहीत. किरकोळ स्वरूपात उपलब्ध होणाऱ्या पेट्यांची वाहतूक सध्या करण्यात येत आहे.
बागायतदारांच्या बागेतून किंवा पॅकिंग हाउसमधून थेट आंबा पेटी उचलण्याची तयारी एस.टी.ने दर्शविली आहे. एस.टी.ने नऊ आगारांत नियोजन केलेल्या ठिकाणी बागायतदारांनी पेट्या आणून देणे. एकाच व्यापाऱ्याकडे सर्व माल उतरविणे. शहरातील विविध भागांत ट्रक जाऊ शकेल, अशा ठिकाणी नगावर माल उतरविणे, असे पर्याय एसटीने बागायतदार, विक्रेत्यांसाठी उपलब्ध केले आहेत. मात्र, अजूनही मोठ्या प्रमाणात पेट्या उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
चार, पाच, सहा डझनांच्या लाकडी पेटीपासून दोन डझनांच्या पुठ्ठ्यांच्या खोक्यापर्यंत सर्व प्रकारच्या पॅकिंगमधील आंबा वाहतुकीची तयारी दर्शविण्यात आली आहे. पुठ्ठ्यांचे खोके वजनामुळे फाटू शकतात. तळातील आंबा पेटीवर दाब पडून काहीवेळा लाकडी खोकाही तुटण्याचा संभव असतो. त्यामुळे पेट्या बसविताना योग्य नियोजन केले आहे.
गतवर्षी एकूण ३५०० आंबा पेट्यांची वाहतूक मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे, अकोला, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्यांत एसटीने आंबा पेट्यांची वाहतूक करण्यात आली होती. मात्र, यंदा आंबा कमी असल्याने फारसा प्रतिसाद लाभत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
........................
लॉकडाऊनकाळात प्रवासी भारमान घटल्यामुळे महामंडळाने मालवाहतुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. ५३ मालवाहतूक गाड्यांमधून वाहतूक सुरू आहे. गतवर्षीप्रमाणे किफायतशीर दरात, राज्याच्या कानाकोपऱ्यांत आंबा वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, आंबा कमी असल्याने तितकासा प्रतिसाद लाभत नाही.
- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी