लांजा :
मुंबई - गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांविषयी लांजातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली आहे. खड्डे लवकरात लवकर न भरल्यास ६ जुलै रोजी महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन मंगळवारी तहसीलदार समाधान गायकवाड यांना देण्यात देण्यात आले.
लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे २६ जून रोजी मुंबई - गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले हाेते; परंतु महामार्गाचे ठेकेदार व अधिकारी यांनी अद्यापही खड्डे भरण्याबाबत कार्यवाही केलेली नाही़ त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच रस्त्यावरील चिखलामुळे पादचारींचे मोठे हाल होत आहेत.
ही सर्व परिस्थिती लक्षात घेता लांजा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वेळोवेळी महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांना पत्रव्यवहार तसेच फोन वरून चर्चा करूनही आजपर्यंत रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. याविराेधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अभिजित राजेशिर्के, तालुका खजिनदार संजय खानविलकर, युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे, दाजी गडहिरे, संतोष जाधव, संदीप नार्वेकर उपस्थित होते.