देवरुख : वडिलांकडून मिळालेले सुतारकामाचे धडे आणि आपल्या अंगी असलेल्या कलागुणांच्या आधारे संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाने-सुर्वेवाडीतील अनंत गणपत सुतार यांनी कुशल नक्षी कारागीर म्हणून संपूर्ण जिल्ह्यात लौकीक मिळवला आहे. घराण्याला लाभलेली सुतारकामाची परंपरा अनंत सुतार यांनी वयाच्या १५व्या वर्षापासून आत्मसात करण्यास सुरुवात केली. आज त्यांचे वय ५९ वर्षे असून गेली ४४ वर्षे ते सुतारकाम करत आहेत. त्यांनी संगमेश्वरसह रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, इस्लामपूर, सातारा आदी ठिकाणी जाऊन लोकांच्या मागणीनुसार विविध प्रकारच्या कलाकृती साकारल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत लाकडातून अनेक सुबक मूर्ती, गौरीचे मुखवटे, आकर्षक पालख्या, पलंग, झोपाळे, दरवाजे बनवून त्यावर सुबक नक्षीकाम केले आहे. वडिलांपासून सुरू असलेली परंपरा आपणसुध्दा पुढे सुरू ठेवावी, या उद्देशाने दिनेश याने वडील अनंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सुतारकाम सुरू ठेवले आहे. नुकतीच त्याने एका लाकडामध्ये सुबक गणेशमूर्ती कोरली असून, कुशल अशा केलेल्या नक्षीकामामुळे ही गणेशमूर्ती सर्वांचे आकर्षण ठरत आहे. या दोघांनी डिझाईन केलेल्या कलाकृती पाहण्यासाठी या ठिकाणी अनेक लोक येत असतात. रत्नागिरीसह रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आदी ठिकाणांहूनदेखील त्यांच्या नक्षीकारागिरीला मोठी मागणी आहे. त्यामुळे त्यांना या कामातून उत्तम रोजगार मिळत आहे. येत्या काही दिवसात जय मल्हारच्या सिंंहासनाची प्रतिकृती साकारण्याचे आमचे नियोजन आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)तरुणवर्गानेही या कलेकडे वळावे सुतारकाम व त्यातील नक्षीकाम (कारविंंग) हे तसे वेळखाऊ व कारकुनी काम आहे. या कामात एकाग्रता महत्त्वाची असते. सध्या या कलेकडे आजचा तरुणवर्ग वळत नाही. कमी कष्टात जास्त पैसा मिळवण्याची मानसिकता आजच्या तरुणवर्गात निर्माण झाली आहे. अशा तरुणांनी हा अविचार बाजूला ठेवून घराण्यातून मिळालेली कला आत्मसात करा, मग ती वाद्यकला असो, सुतारकाम व अन्य कोणतेही कला असो. कारण पोटापाण्याचा उद्योग आपणास जगवू शकतो, पण तुमच्या अंगी असलेली कला तुम्ही का, जगायचे हे सांगून जाते. वडिलांकडून मिळालेली सुतारकामाची कला जोपासत असताना मला एक वेगळे समाधान वाटते आहे, असे मत दिनेश सुतार याने यावेळी व्यक्त केले.
हस्तकौशल्यातून साकारताहेत मूर्ती
By admin | Updated: December 23, 2015 01:29 IST