रत्नागिरी : व्यक्तिमत्त्वविकासात प्रथम ‘स्वत्व’ ओळखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर येथील समुपदेशक ऊर्मिला चव्हाण यांनी केले. त्यांनी पॉवर पॉईंटच्या मदतीने सादरीकरण करून एनसीसी छात्रांची सायकाॅलॉजिकल टेस्ट घेत छात्रांशी मनमोकळा संवाद साधला.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.) नेव्ही विभाग आणि आय.क्यू.ए.सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनामुळे सद्यस्थितीत छात्रांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे शक्य नाही. छात्रांना मानसिक आरोग्य, करिअरचे नियोजन यांचा विचार करून ‘ओळख स्वत:शी’ या समुपदेशनावर आधारित वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
प्रारंभी कॅप्टन डॉ. सीमा कदम यांनी छात्रांना त्यांच्या भविष्यातील करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरेल अशा तज्ज्ञ व्यक्तीचे विचार शिक्षक दिनाच्या निमित्ताने छात्रांसमोर ठेवावेत या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असल्याचे सांगितले.
गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीशील वाटचालीचा आढावा घेत छात्रांकडून उल्लेखनीय पध्दतीने कार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमता विकसित करण्यासाठी योग्य समुपदेशनाची गरज असल्याचे सांगून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी नेव्हल विभागाचे लेफ्टनंट प्रा. अरुण यादव, आर्मी एनसीसी विभागाचे डॉ. एस. एल. भट्टार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लीडिंग कॅडेट सोनाली पाटील, अभिषेक सारंग, वैष्णवी पाटील, प्रणया महाकाळ यांचा सहभाग लाभला.