रत्नागिरी : शहरातील वाहन पार्किग सुविधा सुधारण्याचा प्रयत्न वाहतूक पोलीस सुरू केला असला तरी पार्किंगसाठी राखून ठेवलेल्या जागेत अनधिकृत फेरीवाले ठाण मांडून बसले आहेत. एका बाजूला नगर परिषद अशा लोकांवर कारवाई करून पार्किंगच्या जागा मोकळ्या करून देत नाही आणि दुसऱ्या बाजूला वाहतूक पोलीस मात्र वाहनचालकांना दंड करत आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील वाहनचालकांची अवस्था आई जेवू घालीना आणि बाप भिक मागू देईना, अशी झाली आहे. पार्किंगसाठी वाहतूक पोलिसांकडून ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. शिवाय ठिकठिकाणी पांढरे पट्टे देखील ओढण्यात आले आहेत. पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेर असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र मारूती मंदिर परिसरात सायंकाळच्या वेळेत किरकोळ विक्रेते मोठ्या प्रमाणावर बसतात. फळे, भाज्या, फुले, दीपावलीसाठी फटाके, पणत्या, कंदील या वस्तू घेऊन विक्रेते नेमके पार्किंग परिसरातच बसतात. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते. गर्दीमुळे वाहनचालकांना वाहने पार्किंग परिसरात लावता येत नाहीत. अन्य ठिकाणी वाहने लावल्यास वाहनांवर थेट कारवाई करण्यात येत असल्यामुळे नाहक भुर्दंड पडत आहे. वास्तविक पार्किंग परिसरात बसणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांसाठी जागा निश्चित करणे गरजेचे आहे. जर असे झाले तरच शहरातील वाहन पार्किंग शिस्तबध्द होण्यासाठी मदत होईल. शहरातील वाहतुकीवरील निर्बंध नियमित झाले तरच एक प्रकारची शिस्त येईल. वाहनचालक एखाद्या कामासाठी जाताना कोठेतरी गाडी लावून जातो. त्यासाठी लागणाऱ्या अवधीत गाडी तेथेच असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना ते अडचणीचे ठरते. त्यामुळे होणारा वाहतुकीचा विस्कळीतपणा टाळण्यासाठीच वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. एकीकडे वाहतूक पोलीस पार्किंग क्षेत्रात लावलेल्या गाड्यांवर कारवाई करत आहेत. परंतु, जर या विक्रेत्यांना हटवले नाही तर मात्र वाहनचालकांवरील कारवाई चुकीची ठरेल. वाहनचालकांसाठी पार्किंग परिसर मोकळा करून देण्याची आवश्यकता आहे. विक्रेत्यांना जागा निश्चित करून दिल्यास नक्कीच पार्किंगची जागा मोकळी होईल. दिवाळी असल्यामुळे विक्रेत्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतुकीची व्यवस्था करताना विक्रेत्यांची व्यवस्था करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी) डबल भुुर्दंड वाहतूक पोलीस पार्किंग परिसरात लावलेल्या गाड्या क्रेनव्दारे उचलून घेऊन जातात. वाहनचालकांना आपली गाडी जाग्यावर दिसली नाही की, शोध मोहीम निघते. रिक्षा किंवा अन्य वाहनाने पार्किंगस्थळी जावे लागते. पार्किंग क्षेत्राचे शंभर रूपये व क्रेनव्दारे उचलल्याचे शंभर रूपये अशा दोन पावत्या देण्यात येतात. वास्तविक एकच रक्कम आकारणे ठीक आहे. दोन दोन पावत्यांव्दारे नाहक भुर्दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळे वाहनचालकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आठ ठिकाणी पार्किं ग व्यवस्था रत्नागिरी : पार्किंगचे नियम मोडणाऱ्या दुचाकी टोर्इंग व्हॅनद्वारे उचलण्याची कार्यवाही सुुरु आहे. मात्र, शहर परिसरातील पार्किंगची फक्त आठ ठिकाणे असून, या ठिकाणी सम-विषम तारखेच्या पार्किंगबाबत वाहनधारकांना संभ्रम आहे. प्रशासनाकडून सुरु असलेल्या या कारवाईमुळे वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहर परिसरातील मंगला हॉटेल ते जैन मंदिर, स्वस्तिक हॉस्पिटल ते कौस्तुभ जनरल स्टोअर्स, अशोक हॉटेल ते दिलखुश गादी कारखाना, कलेक्टर कंपाऊंड, कामगार न्यायालय व गो. जो. कॉलेज यांनी (स्वत:ची पार्किं ग व्यवस्था करावी), मारूती मंदिर चौक (आंब्याखाली व शिवाजी स्टेडियमसमोर) शांती सुपर मार्केट ते मारुती आळी पुलावर (व्यापाऱ्यांच्या दुचाकींसाठी ग्राहकांसाठी मंगला हॉटेल ते जैन मंदिर), हेड पोस्ट आॅफीस या ठिकाणी दुचाकी पार्किं गची व्यवस्था करण्यात आली असली तरी सम - विषम तारखेच्या पार्किंगबाबत वाहनधारकांत संभ्रम आहे. वाहतूक विभागाच्या तीन दिवस सुरु असलेल्या या कारवाईमुळे शहरातील वाहनधारकांत खळबळ उडाली असून, गेले तीन दिवस या योजनेचा दणका अनेक वाहन चालकांना बसला आहे. सतत तिसऱ्या दिवशी वाहनतळ नसलेल्या ठिकाणी उभ्या केलेल्या दुचाकींवर टोर्इंग व्हॅनद्वारे कारवाई करण्यात आली असली तरी अजूनही त्यात सुधारणा झालेली नाही. (वार्ताहर)
आई जेवू घालीना, बाप भिकू मागू देईना!
By admin | Updated: November 7, 2015 22:40 IST