चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावर पाग - बौद्धवाडी येथे गतिरोधक नसल्यामुळे यापूर्वी अनेकांचे बळी गेले आहेत. या ठिकाणी गतिरोधक बसवावा, अशी मागणी केली जात असून, महामार्गावरुन धावणाऱ्या गाड्या भरधाव जात असल्याने अधूनमधून येथे अपघात घडतच आहेत. चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती शाखा क्र. १चे अध्यक्ष व आरपीआयचे शहर अध्यक्ष मंगेश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली संस्थेचे उपाध्यक्ष रामदास हळदे, सचिव गौतम जाधव, यु. एस. जाधव आदींच्या शिष्टमंडळाने आज (सोमवारी) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चिपळूण येथील कार्यालयावर धडक दिली. यावेळी उपअभियंता यांना गतिरोधकाबाबत निवेदन सादर करण्यात आले. युनायटेड इंग्लिश स्कूल व पाग बौद्धवाडी येथे गतिरोधक असणे आवश्यक आहे.मुंबई - गोवा महामार्गावरच ही वाडी असल्याने या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. यापूर्वीही या ठिकाणी अपघात घडले आहेत. तसेच काही अंतरावर युनायटेड इंग्लिश स्कूल असल्याने येथेही विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी गतिरोधक उभारावेत, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता काही कामानिमित्त बाहेर गेल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. उपअभियंता यांच्याशी गतिरोधकाबाबत चर्चा झाली. या मार्गावर होणारे अपघात लक्षात घेऊन प्राधान्याने गतिरोधक बसविण्याबाबत जिल्हा कार्यालयाकडे यासंदर्भात कळविण्यात आले असून, त्यांच्याकडून मान्यता मिळताच तातडीने गतिरोधक बसविण्यात येईल, असे आश्वासन उपअभियंत्यांनी दिले. (वार्ताहर)
पाग येथे आणखी किती बळी जाणार ?
By admin | Updated: July 10, 2014 00:00 IST