रत्नागिरी : महिलांचा सन्मान राखणे समस्त पुरूष वर्गाचे, समाजाचे परम् कर्तव्य आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचा सन्मान करण्यात आला आहे. विश्वाची निर्मिती करणारी स्त्री उपेक्षित राहिली आहे. त्यामुळे स्त्रीयांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्वतंत्र व्यासपिठाची गरज आहे. नगरपालिकेनेसुध्दा रत्नागिरी शहरातील महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते बाळ माने यांनी केले.यावेळी व्यासपिठावर नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, उपनगराध्यक्ष राहुल पंडित, महिला व बालकल्याण समिती सभापती राजश्री शिवलकर, माधवी माने, सेनेच्या शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा वीणा रेडीज, नगरसेविका प्रज्ञा भिडे, सुप्रिया रसाळ, बांधकाम सभापती पल्लवी पाटील, पाणी सभापती रामेश्वरी धुळप, सुजाता पुनसकर उपस्थित होते. महिला व बालकल्याण समिती सभापती राजश्री शिवलकर यांनी प्रास्ताविक केले. दिवसाचे २४ तास, आठवड्याचे सात दिवस पूर्णत: कामात व्यस्त असणाऱ्या महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दोन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित केले असल्याचे सांगितले.नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, उपनगराध्यक्ष राहुल रेडीज यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. आज नाट्यछटा, परफेक्ट मॅचिंग, अथर्वशिष्य पठण, मुस्लिम नात पठण तसेच विविध स्पर्धां घेण्यात आल्या. महिलावर्गदेखील उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभागी झाला होता. (प्रतिनिधी)
महिलांचा सन्मान हे आद्य कर्तव्य : माने
By admin | Updated: July 27, 2014 00:50 IST