दापोली : पन्नास वर्षीय गुरुजीचे प्रताप उघड झाल्यानंतर दोनच दिवसांनंतर आणखी एका गुरुजीचे प्रताप उघड झाले आहेत. आपल्याच शाळेतील विद्यार्थिनीशी अतिप्रसंग केल्याप्रकरणी भरबैठकीत गावातच त्या वासनांध गुरुजीची गाडी फोडल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यानंतर हा मास्तर वैद्यकीय रजेवर गेला असून, ग्रामस्थांनी या शाळेत मुले न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी शिक्षणाधिकारी तसेच पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या शाळेला भेट दिली.वेळवी कादिवली पंचक्रोशीमध्ये जिल्हा परिषदेच्या एका शाळेमध्ये ‘खांबा’सारखा असणारा हा वासनांध गुरुजी नोकरी करीत आहे. गेल्या वर्षांपासून त्याने आपली वासना भागवण्यासाठी शाळेतील सहावी व सातवीतील काही विद्यार्थिनींशी लगट वाढवली होती. गेले अनेक दिवस हा प्रकार चालू असल्याचे गावात चर्चिले जात होते. मात्र, चार दिवसांपूर्वी त्याने नेहमीप्रमाणे एका विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे करताना पोषण आहार शिजवणाऱ्या बाईने रंगेहाथ पकडले आणि संपूर्ण गावामध्ये बभ्रा झाला. पुढाऱ्याने मध्यस्थी करुन वेळवी गावामध्ये बैठक घेण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे दोन दिवसांपूर्वी बैठक चालू असतानाच हा गुरुजी आम्हाला शाळेत नको, तत्काळ बदला, अशी मागणी ग्रामस्थांनी भरबैठकीत केली व संतापलेल्या काही ग्रामस्थांनी शिक्षकाच्या चारचाकी गाडीवर हल्ला चढवित गाडीची काच फोडून टाकली. गुरुजीला शाळेतून हाकला, या विषयावर बैठक समाप्त झाली. गुरुवारी या गावातील ग्रामस्थांनी सदर शिक्षकाच्या विरोधात दापोलीच्या पंचायत समितीच्या सभापतीकडे अर्ज दिला आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी नंदलाल शिंदे म्हणाले की, या शिक्षकाबद्दल ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे, तशा स्वरुपाचा अर्जही पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत. मात्र, या अर्जामध्ये शिक्षकाचे गैरवर्तन व उध्दट बोलणे एवढीच मोघम कारणे नमूद करण्यात आली आहेत. त्यामुळे गुरुवारी आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन पाहणी केली, त्यावेळी याच गावातील काही पालकांनी हा शिक्षक जर शाळेत राहणार असेल, तर आम्ही आमच्या मुलांना शाळेतच पाठवणार नाही, असा केवळ इशाराच न देता काही पालकांनी विद्यार्थिनींना शाळेतच पाठविले नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या गंभीर प्रकारासंदर्भात शाळेला दापोलीच्या सभापती दीप्ती निखार्गे व उपसभापती उन्मेष राजे यांनीही काल भेट दिली व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी सभापती निखार्गे यांनी सत्य परिस्थिती शासनासमोर आणावी, असे आवाहन तेथील स्थानिक ग्रामस्थांना केले आहे. तर उपसभापती उन्मेष राजे म्हणाले की, जर पालकांनी तशा स्वरुपाची तक्रार दिली तर आम्ही शिक्षकांवर कडक कारवाई करू, असे सांगितले. (प्रतिनिधी)
शिक्षकाचा विद्यार्थिनींवर अतिप्रसंग
By admin | Updated: July 9, 2016 00:59 IST