राजापूर : तालुक्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक रोखण्यात आरोग्य विभागाला यश आल्यामुळे सध्या तालुक्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा ४३ इतका कमी झाला आहे. मात्र, गणेशोत्सव काळात मुंबईसह अन्य भागातून दाखल झालेले चाकरमानी आणि होणारी गर्दी या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य विभाग अधिक सतर्क झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. निखील परांजपे यांनी दिली आहे. दोन दिवसांत मुंबईसह अन्य भागातून आलेल्या आठशे जणांची अँटिजन तपासणी करण्यात आली असून, त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, ही बाब दिलासादायक असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने राजापूर तालुक्याला जोरदार तडाखा दिला. १० सप्टेंबरपर्यंत तालुक्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५,०७५ वर पोहोचला असून, यातील ४,८३८ जण उपचारांती पूर्णपणे बरे झाले आहेत. १९४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आता रुग्ण संख्या आटोक्यात असल्याने सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सध्या तालुक्यात ४३ सक्रिय रुग्ण आहेत. यातील ३७ जण होम आयसोलेशनमध्ये, ५ जण जिल्हा रुग्णालयात तर १ जण जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
गणशोत्सव काळात तालुक्यात मुंबईकर चाकरमान्यांसह अन्य भागातील नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन आरोग्य विभागाने विशेष नियोजन केले आहे. तालुक्यात राजापूर रेल्वे स्थानक व एस. टी. आगार डेपो या ठिकाणी विशेष तपासणी पथक नियुक्त करण्यात आले आहे. गाव पातळीवर ग्राम कृती दलांच्या माध्यमातून गावात दाखल होणाऱ्या जिल्ह्याबाहेरच्या व्यक्तींच्या तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. राजापूर तहसीलदार कार्यालयामार्फत नियुक्त करण्यात आलेले नोडल ऑफिसर देैनंदिन डाटा संकलित करीत आहेत. कोरोना चाचणी करून आलेल्या व दोन डोस घेतलेल्यांची कोणतीही तपासणी केली जाणार नसून, अन्य व्यक्तींची अँटिजन तपासणी केली जाणार आहे.