रत्नागिरी : उष्णजल प्रक्रियेचे निर्बंध शिथिल केल्याने परदेशात आंब्याची निर्यात करणे साेपे हाेणार आहे. गेल्या आठवड्यात कतारसाठी ४२६ डझन तर लंडनसाठी ३६६ डझन आंबा निर्यात करण्यात आला आहे. तर येत्या चार दिवसांत १६ टन आंबा दुबई व ४०८ डझन आंबा लंडनकडे पाठविण्यात येणार आहे.
ऋतुमानातील बदलामुळे या वर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. तयार झालेला आंबा वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. पैकी ४० टक्के आंब्याची निर्यात आखाती व युरोपीय देशांत सुरू होती. मुंबईतून आंबा निर्यात होत असताना पणन विभागाच्या माध्यमातून सद्गुरू एंटरप्रायझेसतर्फे आंबा निर्यातीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच माध्यमातून गेल्या आठवड्यात कतार आणि लंडनला आंब्याची निर्यात करण्यात आली हाेती.
आंब्याची निर्यात करण्यापूर्वी आंब्याचे ग्रेडिंग, वॉशिंग, ब्रशिंग, ड्राइंग करून तो योग्य पद्धतीने पॅकिंग करून वातानुकूलित व्हॅनने मुंबईतील विमानतळावर पाठविण्यात येतो. लंडनमधून मागणी होत असतानाच आता दुबईतूनही मागणी सुरू झाली आहे. मुस्लीम बांधवांचा रमजान मास लवकरच सुरू होत असल्याने आंब्याला मागणी वाढण्याची शक्यता आहे. सध्या दुबईतून १६ टन हापूससाठी मागणी नोंदविण्यात आली आहे. लंडनसाठी २०० ते २२० ग्रॅमच्या वजनाचा तर कतारसाठी २३० ते २७० ग्रॅम वजनाच्या आंब्याची निवड करण्यात येते.
कोट
जिल्ह्यातील बागायतदारांना चांगले पैसे मिळवून देण्यासाठी गेली तीन वर्षे विविध देशांमध्ये आंबा निर्यात करण्यात येत आहे. पणन मंडळाच्या प्रक्रिया केंद्रामध्ये आंब्यावर प्रक्रिया करून आंब्याचे पॅकिंग करून विक्रीसाठी पाठविण्यात येतो. सध्या दुबई व लंडनमधून मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी संपर्क सुरू केला आहे. लवकरच दुसरे कन्साइनमेंट पाठविण्यात येणार आहे.
- प्रांजली प्रशांत नारकर, संचालिका, सद्गुरू एंटरप्रायझेस