रत्नागिरी : दिवाळीतील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता एस. टी.ला होणारा तोटा भरुन काढण्यासाठी वीस दिवसांकरिता हंगामी भाडेवाढ जाहीर करण्यात आली होती. वीस दिवसात रत्नागिरी विभागाला १६ कोटी ३६ लाख ९७ हजारांचे उत्पन्न लाभले आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे ५ ते २५ नोव्हेंबरपर्यंत हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. गतवर्षी दिवाळी सुटीत रत्नागिरी विभागाला १४ कोटी १६ लाख ७३ हजारांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २ कोटी २० लाख २४ हजाराने उत्पन्नात वाढ झाली आहे.महामंडळाला लवचिक भाडेवाढीचा अधिकार आहे. पहिल्यांदाच दिवाळी सुटीत हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. साध्या व रातराणी गाडीसाठी १० टक्के, निमआराम गाडीसाठी १५ टक्के, वातानुकुलीत बससाठी २० टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. २२ आॅगस्ट २०१४ रोजी महामंडळातर्फे नियमित भाडेवाढ करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर इंधनाच्या दरातील चढउतार विचारात घेता महामंडळाने तिकीट दर स्थिर ठेवले होते. दिवाळीच्या सुटीत सहल व पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या अधिक असल्यामुळे तोटा भरून काढण्यासाठी हंगामी भाडेवाढ जाहीर करण्यात आली होती. पहिल्या स्टेजला एक रुपया दराने भाडेवाढ लागू करण्यात आली होती. या दरवाढीचा महामंडळाला फायदा झाला आहे.गतवर्षी दीपावली आॅक्टोबरमध्ये होती. त्यावेळी रत्नागिरी विभागाला १४ कोटी १६ लाख ७३ हजारांचे उत्पन्न मिळाले होते. तर दिवाळीच्या दिवसात १६ कोटी ३६ लाख ९७ हजारांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २ कोटी २० लाख २४ हजार इतके उत्पन्न जास्त मिळाले. हंगामी तिकीटवाढीमुळे प्रवासी भारमानावर परिणाम होईल, असे सुरूवातीला वाटले होते. मात्र, भारमानावर परिणाम न होता, उत्पन्नात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. महामंडळाने हंगामी भाडेवाढीचा घेतलेला निर्णय फायद्याचा ठरला आहे. त्यामुळे यापुढेही हंगामी दरवाढ करण्याचा निर्णय महामंडळ घेऊ शकते. (प्रतिनिधी)
उत्पन्नात तब्बल दोन कोटींची वाढ
By admin | Updated: December 2, 2015 00:44 IST