चिपळूण : शहरातील खेंड, उक्ताड, कांगणेवाडी, कानसेवाडी, मापारी मोहल्ला परिसराचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. या भागात एकाचवेळी खेंड कांगणेवाडी येथील टाकीतून ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा होणार असल्याने येथील पाण्याची समस्या कायमची सुटणार आहे. यासाठी उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती लियाकत शाह यांनी विशेष मेहनत घेतली आहे. त्यांच्याच प्रयत्नांमुळे या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.हे काम सुरू असून, येत्या दोन दिवसात पूर्ण होणार आहे. गेले सहा महिने हा प्रश्न सुटत नव्हता. जागामालकाच्या वादामुळे पाईपलाईन टाकणे शक्य होत नव्हते. उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांच्या प्रयत्नाने हे काम मार्गी लागले असून, ग्रॅव्हिटीसाठी पाईपलाईनचे काम सुरू आहे. दोन दिवसात ते पूर्ण होऊन येथील नागरिकांना एकाचवेळी पाणी मिळणार आहे. यापूर्वी गोवळकोट येथील पाणी खेर्डीतून पंपाच्या सहाय्याने कांगणेवाडीतील ६० हजार लीटर टाकीत चढवले जायचे. हे पाणी चढवण्यासाठी दीड ते दोन तासांचा वेळ लागायचा. त्यानंतर हेच पाणी कांगणेवाडी, खेंड चौकी, उक्ताड, मापारी मोहल्ला, कानसेवाडी या भागाला टप्प्याटप्प्याने सोडले जायचे. वीज गेल्यानंतर त्यामध्ये व्यत्यय यायचा. शिवाय खेंड येथील पंपामधील बिघाड यामुळे कांगणेवाडी, खेंड चौकी, उक्ताड भागाला अवेळी पाणीपुरवठा तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम होती. या समस्येमुळे नागरिक सातत्याने नगर परिषदेकडे विचारणा करीत होते. याची दखल शाह यांनी घेतली आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. यासाठी स्वत: लक्ष घालून त्यांनी ग्रॅव्हिटीची योजना मंजूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यासाठी नगराध्यक्षा सावित्री होमकळस व सर्व सदस्यांची सहमती मिळवली आणि नगर परिषदेच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता मिळाली. कांगणेवाडीतील पाण्याची टाकी तब्बल आठ लाख लीटरची असून, ही टाकी ५५ मीटर उंचीवर आहे. या टाकीतून ग्रॅव्हिटीने सर्व भागाला एकाचवेळी उच्चदाबाने पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. यामुळे खेंड येथील पंपसेट बंद ठेवावा लागणार आहे. एकाचवेळी सर्व भागाना ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा होणार असल्याने वीजबिल वाचणार असून, याठिकाणचे कामगारदेखील कमी होतील. एकंदरीत या योजनेमुळे नगर परिषदेच्या पाणी योजनेचा तोटा कमी होणार आहे. पंपाच्या दुरूस्तीसाठी आता वारंवार खर्च आता येणार नसल्याने पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. शिवाय नगर परिषदेचा खर्चदेखील वाचणार आहे. (प्रतिनिधी)
उक्ताडला ‘ग्रॅव्हिटी’ने पाणी
By admin | Updated: May 26, 2015 00:56 IST