शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

गवरकोंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:29 IST

गौरी गणपतीचे विसर्जन करण्याची जागा म्हणजे ‘गवरकोंड’. गणपती विसर्जन करण्यासाठी पाण्याची उंची वाढवायला बंधारा बांधायला लागायचा त्यासाठी वाडीतील लहान, ...

गौरी गणपतीचे विसर्जन करण्याची जागा म्हणजे ‘गवरकोंड’. गणपती विसर्जन करण्यासाठी पाण्याची उंची वाढवायला बंधारा बांधायला लागायचा त्यासाठी वाडीतील लहान, मोठी पोरं गवरकोंडीवर जायची. आम्ही शाळकरी मुलं ही सामील व्हायचो. कधी घरातून परवानगी नसली तरी लपून छपून गवरकोंड गाठायचो.

पाटलांचा बाबू, ओम्या उंबर कोंडीवरचा अनू, बंटी, जयदीप, बांधावरचा बंटी, दळव्यांचा प्रसाद, मांडाजवळचा बबन, गुरववाडचा योग्या, भुश्या, किशोर अशी सगळी पोरं असायची. वाडीतील मोठी मुलं या कामात अग्रेसर असायची. आमच्या सारखी शाळकरी मुलं मदतीला.

खाल्लेवाडचा कैलास, मिलिंद, फडावरचा समीर, हैबूदा, रूप्या, सरफरे बाबू, गुरववाडचा जयू, रासू, पयलीकडला बारक्या यासारखी अनेक दादामंडळी गवरकोंड बांधायला पुढे असायची. सर्वजण न्याहरी करून तयार व्हायचे कारण दुपारी जेवायला परतायचं असायचं.

सगळे उत्साहात निघायचे. गवरकोंडीचा तो नयनरम्य परिसर पाहून मन प्रसन्न होऊन जायचं. गवरकोंडीचा पऱ्या शांत, नितळ आपल्याच नादात वाहत असायचा. कोंडीच्या दोन्ही बाजूला असलेला माळ जणू हिरवी चादर पांघरून आहे, असा भास व्हायचा. त्यावर उगवलेल्या सोनतळी त्या माळावर सोनेरी रंग भरायच्या तर मधेच उगवलेल्या तिरडा, कुर्डू त्या माळाची शोभा वाढवायचे. सकाळी पसरलेली पिवळसर सूर्याची किरणे त्या माळाला झगमगीत करायची. आजूबाजूच्या परिसरातून येणारा, पक्षांचा किलबिलाट, मोराचा केकारव कान तृप्त करायचा. पानं, फुलं, पक्षी, पाणी हा सारा नैसर्गिक खजिना पाहून होणारा आनंद अवर्णनिय होता.

सकाळी लवकर सुरूवात करून दुपारपर्यंत काम आटपायचं असायचं त्यामुळे सगळे वेगाने कामाला लागायचे. वाडीतली ज्येष्ठ माणसं आपली जनावरे चरायला सोडून कामात मदतीला यायचे. कोण लहान मोठे दगड गोळा करायचे, तर कोणी टिकावाच्या सहाय्याने माती खोदायचे काम करायचे. आमचे काम खोदलेली माती घमेल्यात भरून आणून द्यायची आणि झाडपाला घेऊन यायचा. काही पोरं कुपलातून आयनाच्या झाडाचा टाळा घेऊन यायची. झाडपाल्या सोबत गवतही नेऊन द्यायाचो. दादा मंडळी पऱ्यात उतरून बंधारा बांधण्यासाठी दगड रचायला सुरुवात करायचे. छाती एवढ्या उंचीचा बंधारा बांधला जायचा. त्याच्या तळाशी गवत आणि झाडपाला चेपून ठेवत असू जेणेकरून खालून पाणी अडलं जावं. जसजशी बंधाऱ्याची उंची वाढत जायची तशी पाण्याला तुंब मारायची. ढोपरापर्यंत असणार पाणी छातीपर्यंत कधी पोहाेचायचे कळायच नाही. पाण्याची फुग गवळणीच्या पडगीपर्यंत जायची. कधी कधी याच गवळणीच्या पडगीत आम्ही क्रिकेट खेळायचो.

ही ‘गवरकोडं’ म्हणजे आमचं हक्काचं स्विमिंग पूल होत. एक वेड होत त्या काळातलं गवरकोडं. धरण बांधून झाल्यावर कामचुकार पोरांना कोंडीत पाणी तोंडावर मारून हैराण केलं जायचं. एक वेगळाच माहोल असायचा.

जिथं बंधारा बांधला जायचा त्याच्या पुढच्या बाजूला भोवरा होता. त्या भोवऱ्याची आम्हाला भीती घातली जायची. तर वरच्या बाजूला ढव (डोह) होता. या कोंडीतून एक दोन वेळेला वाडीतले काहीजण वाहता वाहता वाचले आहेत अस मी ऐकलं आहे.

गणपती विसर्जन दिवशी गवरकोंडीच्या माळावर सगळे गणपती एका रांगेत बसवले जायचे मागे गवर उभ्या केल्या जायच्या. आरती करून आम्ही बांधलेल्या बंधाऱ्यात गवर गणपतींचं विसर्जन केलं जायचं. त्या दिवशी आम्ही पोहण्याचा आनंद पुन्हा लुटायचो. निघताना गवरकोंड डोळे भरून पहायचो. फुलं, हार गवरकोंडीच्या पाण्यात तरंगत असायचे. तिच्या तळाशी असणाऱ्या गणपती बाप्पाची मूर्ती आमच्या मनाच्या तळाशी बसायची ती पुढच्या वर्षीच्या बाप्पाच्या आगमनापर्यंत.

दहा वर्षांपूर्वी गवरकोंड आणि आजूबाजूच्या परिसरात धरण बांधण्यात आले, त्यात गवरकोंड विसर्जित झाली. तसेच गवळणीची पडगी, आवळे टेंब, पिपला सकल, कालांबा, भोकर, तुणतुणं, निदान टेंब, देसार, तांबळ, बाविसकल यासारखे परिसरही धरणाच्या पाण्याखाली गेले. त्यामुळे आता गवरकोंड बांधण्याच्या सोहळ्याला मुकावं लागत. धरण बांधल्यापासून गणपती बाप्पांचे विसर्जन धरणात केले जाते. पण जेव्हा जेव्हा गणपती विसर्जनाला जातो तेव्हा तेव्हा गवर कोंडीची आठवण येते.

- विराज वि. चव्हाण, वाटूळ, राजापूर