खेड तालुक्यातील चिंचघर - वेताळवाडी येथे खेड पाेलिसांकडून गाेवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : वीकेंड लॉकडाऊनच्या कालावधीत अवैधरीत्या गोवा बनावटीची दारू चढ्या दराने विकणाऱ्या संतोष अशोक कदम (३०, रा. चिंचघर, वेताळवाडी, ता. खेड) याला खेड पोलिसांनी धाड टाकून मुद्देमालासह अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (११ एप्रिल) रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
लाॅकडाऊनच्या कालावधीत पोलीस अधिकारी, कर्मचारी हे बंदोबस्तात व्यस्त असताना अवैध दारू व्यावसायिक या संधीचा फायदा घेऊन अवैध व्यवसाय सुरू ठेवतील, असा संशय होता. त्यामुळे अशा अवैध व्यावसायिकांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी दिले होते. या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत काशीद व खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांना चिंचघर - वेताळवाडी येथे दारूची विक्री हाेत असल्याची माहिती मिळाली. धाड टाकली असता संतोष अशोक कदम घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत बिगरपरवाना देशी-विदेशी बनावटीच्या कंपनीची दारू बाजारातील दरापेक्षा अधिक दराने बेकायदेशीररीत्या विक्री करत असल्याचे दिसले.
तपास पथक अंमलदार पोलीस नाईक वीरेंद्र आंबेडे, पोलीस शिपाई संकेत गुरव, साजिद नदाफ, अजय कडू, सीमा मोरे यांनी संताेष कदमला अटक करून यांच्याकडून ३० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम ६६(१)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे करत आहेत.