संदीप बोडवे -मालवण -देशासह जागतिक बाजारपेठेत अब्जावधीचा व्यापार करणारा फळांचा राजा हापूस आंबा ग्लोबल वॉर्मिंगमुळे अस्मानी संकटात सापडला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे उरला सुरला हापूस तग धरेनासा झाला आहे. प्रखर सूर्यकिरणांमुळे परिपक्व आंबा फळे झाडावरच होरपळून निघत आहेत. सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि आता तापमान वाढ यामुळे येथील आंबा बागायतदार पुरता मेटाकुटीस आला आहे.गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात आलेली उष्णतेची लाट आंबा पिकासाठी धोक्याची घंटा देणारी ठरली आहे. संपूर्ण राज्य होरपळून निघत असताना कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंब्यालाही तापमानवाढीचा चटका सहन करावा लागला आहे. येथील हापूस आंबा अतिशय संवेदनशील असल्याने तापमानातील बदल आंबा पिकावर परिणामकारक ठरत आहेत. अति थंडीबरोबरच अति उष्णताही आंबा पिकाला मानवेनासी झाली आहे.कोकणातील तापमानात मागील पाच-सहा वर्षांपासून सातत्याने वाढ नोंदली गेली आहे. यावर्षी याची तीव्रता अधिकच आहे. आठवडाभरापासून अचानक वाढलेली असह्य उष्णता आंबा पिकालाही सहन होईनाशी झाली आहे. डोंगराळ भागात व कातळावर असलेल्या आंबा बागांना याचा फटका अधिक प्रमाणात बसू लागला आहे. समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या बागांमधील आंबा फळे प्रखर सूर्यकिरणांमुळे झाडावरच भाजून निघत आहेत. यामुळे बागायतदारांचे नुकसान होऊ लागले आहे.प्रखर सुर्यकिरणांचा फटकामागील चार पाच वर्षांपासून कोकणात सामान्य तापमानामध्ये तीन ते चार डिग्रीने वाढ झाली आहे. यावर्षी येथील तापमान ३७ अंशांच्याही पुढे गेले आहे. हापूस आंब्याची साल पातळ असल्याने प्रखर सूर्यकिरणांमुळे आंब्याच्या ‘पिगमेंटेशन’मध्ये बदल होऊन ‘अॅन्थोसायनिन’ प्रोसेसमध्ये वाढ व्हायला सुरुवात होते. यामुळे आंबा फळ खराब व्हायला सुरुवात होते.- डॉ. भरत साळवी,सहयोगी संशोधन संचालक,प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला
हापूसला ग्लोबल वॉर्मिंगचा फटका
By admin | Updated: May 26, 2015 00:56 IST