दापोली : महिला दक्षता समिती केवळ पती-पत्नी व कुटुंबातील वाद मिटविण्यापुरती न राहता तारुण्याच्या उंबरठ्यावरचं पहिलं पाऊल ते देशाचा भावी जाबबदार नागरिक म्हणून घडविण्याची नैतिक जबाबदारी महिला दक्षता समितीने उचलली असून, आता शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जीवन शिक्षणाचे धडे मिळणार आहेत.दापोलीचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी महिला दक्षता समितीच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ नावापुरती कागदावर महिला दक्षता समिती नको. महिला दक्षता समितीच्या नावाखाली सुरु असलेली राजकीय दुकानदारी बंद करून पोलीस स्टेशन बोर्डावर झळकणाऱ्या निष्क्रीय महिलांना डिस्चार्ज करत अभ्यासू व सामाजिक भान असणाऱ्या महिलांची महिला दक्षता समितीवर वर्णी लावली आहे. महिला दक्षता समिती केवळ कौटुंबीक वाद मिटविण्यापुरती नसून या समितीला ग्लोबल टच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.समाजात चंगळवाद वाढला आहे. त्यामुळे सतत वाढत राहणाऱ्या गरजा, गरीब आणि श्रीमंतांमधील वाढती दरी, समाजात पसरलेला भ्रष्टाचार, प्रसार माध्यमांचा वाढता प्रभाव, स्त्रियांवरील अत्याचार, बलात्काराच्या वाढलेल्या घटना, बाबा, बुवा भगतांकडून होणारे मानसिक, शारीरिक, आर्थिक शोषण, गुटखा, तंबाखू, दारु यांसारख्या व्यसनांचा तरुण पिढीला पडणारा विळखा, या सामाजिक वास्तवतेची परिस्थिती बदलण्यासाठी महिला दक्षता समिती दापोली पोलीस स्टेशन व सखी समुपदेशन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कुमारवयीन विद्यार्थी - विद्यार्थिनींना शाळा, कॉलेजात जीवन शिक्षणाचे धडे मिळणार आहेत.समाजातील वाढती गुन्हेगारी, त्याचे स्वरुप व त्यावरील उपाय याबाबत महिला दक्षता समितीकडून समुपदेशन केले जाणार आहे. समाजातील दृष्ट प्रवृत्ती, अनिष्ट प्रथा, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालून, सुजाण नागरिक बनवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. परंतु या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपली जबाबदारी झटकू पाहात आहे. परंतु आता सुदृढ समाज घडविण्याची जबाबदारी महिला दक्षता समितीने घेतली आहे. कुटुंबापासून समाजापर्यंत सर्व विषयावर समुपदेशन केले जाणार आहे. महिला दक्षता समितीला प्रशिक्षण देऊन त्यांच्या मार्फत सामाजिक काम करुन घेतले जाणार आहे. शनिवारी सर्वप्रथम सर्व महिला दक्षता समिती, सखी समुपदेशन केंद्र पोलीस स्टेशन महिला कर्मचारी यांचे ब्रेनवॉश करण्यात आले. प्रशिक्षित महिलांचे गट तयार करुन प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये आता महिला दक्षता समिती जीवन शिक्षणाचे धडे देण्यास दक्ष झाली आहे. गुरुवार, १० जुलै रोजी या कार्याचा शुभारंभ होणार असून, शाळा, कॉलेजमध्ये समुपदेशन केले जाणार आहे. महिला दक्षता समितीचे कार्य व जबाबदारी समाज हिताच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. त्यासाठी सामाजिक जाण असणाऱ्या व्यक्तीची समितीत वर्णी लागायला हवी होती. परंतु तसे न होता केवळ राजकीय महिलांची वर्णी लावून पोलीस स्टेशनच्या दक्षता समितीच्या बोर्डवर झळकण्यापुरतेच त्याचे काम झाल्याने या समितीत फेरबदल करुन सामाजिक जबाबदारी समितीवर टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.- प्रमोद मकेश्वर, पोलीस निरीक्षक(प्रतिनिधी)
महिला दक्षता समितीला मिळाला ग्लोबल टच
By admin | Updated: July 9, 2014 23:58 IST