दापोली : भारतीय जनता पक्षाच्या दापोली तालुका शाखेतर्फे येथील उपजिल्हा रुग्णालयाला ७५ हायफ्लो कॉन्स्ट्रेशन ऑक्सिजन मास्क देण्यात आले. या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन मास्कची कमतरता असल्याने भाजप विमुक्त आघाडीचे कोकण संयोजक भाऊ इदाते यांच्या प्रयत्नाने हे मास्क देण्यात आले.
मास्क सॅनिटायझर वाटप
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील भोवडे येथील कै. सौ. सीताबाई बाईंग प्रतिष्ठान आणि बीसीसी क्लब भोवडे, तसेच कै. गिरीश कृष्णा बाईंग यांच्या स्मरणार्थ मास्क आणि सॅनिटायझर फवारणी पंपाचे नुकतेच वाटप करण्यात आले. उपक्रमाचा प्रारंभ गणपत बाईंग यांच्या हस्ते भोवडे बाईंगवाडीत झाला.
नागरिकांची तपासणी
दापोली : तालुक्यात वाढू लागलेला कोरोनाचा प्रसार थोपविण्यासाठी पोलीस दलही सज्ज झाले आहे. दाभोळ सागरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी यासाठी भोपण गाव दत्तक घेतले आहे. या गावातील नागरिकांची तपासणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी कोरोनाचा प्रसार रोखण्यासंदर्भात मार्गदर्शनही करण्यात आले.
लस मोहीम नियोजनबद्ध
रत्नागिरी : तालुक्यातील चांदेराई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसींचे वितरण ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहे. या दोन्ही लसी शासनाच्या आदेशानुसार ऑनलाइन प्रक्रियेने नोंदणी केलेल्या व्यक्तीला दिल्या जात आहेत. नियोजन योग्यरीतीने झाल्याने शांतपूर्ण वातावरणात लसीकरण होत आहे.
कोरोना रोखण्यास गावे सज्ज
मंडणगड : तालुक्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यास आरोग्य यंत्रणेच्या अथक प्रयत्नांना यश मिळत आहे. अनेक गावांनी आता यासाठी सज्जता ठेवली आहे. अनेक गावांमध्ये बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही. त्याचबरोबर कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचे पालन केले जात असल्याने अनेक गावांनी कोराेनाला वेशीबाहेर ठेवले आहे.