लांजा : मुचकुंडी नदीच्या महापुरामुळे घरात पाणी घुसून नुकसान झालेल्या विलवडे गावातील पाच कुटुंबांना लांजा तालुका इंदिरा काँग्रेसच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली.
दापोलीला जोरदार पावसाची प्रतीक्षा
दापोली : गेल्या चार दिवसांपासून शहरासह तालुकाभरात पावसाची रिमझिम सुरू आहे. भातशेतीसाठी अजून पाऊस आवश्यक असल्याने तालुक्यातील बळिराजा जोरदार पावसाकडे डोळे लावून बसला आहे. सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू आहे.
चिपळुणात चिखलाचे साम्राज्य
चिपळूण : शहरात चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यातच चौपदरीकरण करणाऱ्या ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी खडीमिश्रित माती आणि वाळूचा वापर केला आहे. त्यामुळे पावसाची सर आल्यास महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते.
वीज बिल थकबाकी वसुली मोहीम
गुहागर : तालुक्यात तब्बल अडीच कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर थकबाकी भरा, अन्यथा वीज पुरवठा तोडण्यात येईल, अशी थकबाकी वसुलीची मोहीम महावितरणने सुरू केल्याने अनेकांचे मीटर बंद होत आहेत.
पूरग्रस्तांना मदत
राजापूर : शेतकरी व लाकूड व्यापारी संघटना, राजापूरच्या वतीने खेड येथील पूरग्रस्त, तसेच आपत्तीग्रस्तांना मानवतेच्या भावनेतून अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. संघटनेच्या सदस्यांनी पोसरे येथे जाऊन दुर्घटनाग्रस्त जागेची पाहणी केली. यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.