असगोली : गुहागर तालुक्यातील कोतळूक आरोग्य उपकेंद्र येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने सुरू करावे, अशी मागणी कोतळूक ग्रामपंचायत सदस्य व भाजपा तालुका सरचिटणीस सचिन ओक यांनी केली आहे.
कोतळूक गावात गेल्या महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक हाेती़ ग्रामकृतीदल, आरोग्य विभाग यांच्या प्रयत्नातून सध्यातरी यावर नियंत्रण राखण्यात यश आले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ४५वर्षांवरील वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस देणे सुरू आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने एसटी तसेच खासगी वाहतूक बंद असल्याने लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी नागरिकांना साधने उपलब्ध हाेत नाहीत़ तसेच भाड्याने खासगी वाहन करून जाणे हे आजच्या परिस्थितीत शक्य नाही. त्यामुळे गावातील ४५वर्षांवरील अनेक नागरिक लसीकरणाच्या पहिल्या डोसपासून वंचित आहेत. तर ज्यांनी पहिला डोस घेतला आहे ते दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. कोतळूक गावाचा विचार करून आरोग्य विभागाच्या कोतळूक उपकेंद्रात सर्व प्रकारचे लसीकरण करण्यासाठी त्वरित निर्णय घ्यावा़ यासाठी आपणास जे सहकार्य लागेल ते करण्यासाठी भारतीय जनता पक्षाबरोबरच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आवाहन करून ते सुद्धा या चांगल्या कामासाठी तयार होतील़ कोतळूक ग्रामपंचायतही योग्य ते सहकार्य करेल, अशी ग्वाही सचिन ओक यांनी दिली आहे़ कोतळूक उपकेंद्रात लसीकरण सुरू करून नागरिकांचे होणारे हाल थांबवून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही केली आहे.