रत्नागिरी : कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग राखताना गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याची सूचना शासनाने केली आहे. त्यामुळे सर्वत्र शांततेत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या वर्षी ओवसे असल्याने गौरीपूजनानिमित्त घरोघरी लगबग सुरू होती. नवविवाहितांची ओवसे घेऊन जाण्याची घाई झाली होती. सोशल डिस्टन्सिंग राखताना भाविकांनी गणेश दर्शनासाठी जाणे टाळले.
वर्षभर भाविक गणपत्ती बाप्पाची आतुरतेने वाट पाहत असतात. गणेश चतुर्थीला गणेशमूर्तींची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली. दररोज आरती, भजन, सहस्रावर्तने, अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा आदी विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असतानाच रविवारी गौराईचे आगमन झाले. सोमवारी गौरीपूजन हा महत्त्वाचा सण साजरा करण्यात आला. या वर्षी ओवसे असल्याने गौरीपूजन व पूजेसाठी नैवेद्यासह ओवसे ठेवण्याची लगबग सुरू होती. ओवशासाठी पाच प्रकारची फळे, फराळाचे विविध जिन्नस सुपात मांडून गौरीसमोर वाण ठेवण्यात आले होते. घरच्या गौरीला वाण ठेवून धार्मिक परंपरेने पूजा करण्यात आली. सासरी तसेच माहेरी ओवसे घेऊन जाणाऱ्या नवविवाहितांची लगबग सुरू होती. वाणांनी भरलेली सुपे घेऊन जाण्यासाठी रिक्षा, खासगी वाहन करण्यात आले होते. गौरीला काही ठिकाणी पुरणावरणाचा, वड्याचा नैवेद्य दाखविण्यात आला. सोमवार असल्याने मटण, चिकनचा बेत रद्द करण्यात आला. मात्र वड्याच्या तयार पिठाचा विशेष खप झाला.
शासकीय कार्यालयांना गौरी-गणपती विसर्जनानिमित्त सुट्टी आहे. मात्र सोमवारी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू होती. सणानिमित्त नोकरदार महिलांची संख्या मात्र तुलनेने कमी दिसत होती. काही खासगी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. शहरातील बहुतांश दुकाने, चहाच्या टपऱ्या, हॉटेल्स बंद होती. मिठाईची दुकाने, भाजी, फळ विक्रेते, औषधांची दुकाने मात्र सुरू होती.