रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कोरोनापासून हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. राज्यातील इतर भागात पर्यटन स्थळांना मोकळीक मिळाली, पण श्रीक्षेत्र गणपतीपुळेबाबत दुजाभाव का? असा सवाल करून येत्या पाच दिवसांत याबाबतीत योग्य निर्णय झाला नाही, तर गणेशोत्सवासाठी हे आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र समविचारी मंचच्यावतीने देण्यात आला आहे.
राज्यभरात राजकीय दबावातून अनेक पर्यटन स्थळे खुली झाली. मात्र, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळेतील श्रीगणेश मंदिर बंद आहे. याबाबतीतच दुजाभाव का? महानगरे, मॉल, दारूविक्री अशी गर्दीची ठिकाणे बिनदिक्कत सुरू आहेत, याबाबत लोकप्रतिनिधींना काही करावे वाटत नाही मग आम्ही हे का म्हणून सहन करायचे? शेकडो उद्योग बंद आहेत. कामगार मिळविणे कठीण झालेय. मंदिर बंद ठेवून काय साधलेय? असे प्रश्न समविचारीने उपस्थित केले आहेत.
गणेशोत्सव आता काही दिवसांवर आला आहे. या परिसरातील प्रत्येक घरातील लोक हीच गणेश मूर्ती आपले आराध्य दैवत म्हणून मानतात आणि पुजतात. हे मंदिर या भाविकांसाठी तत्काळ खुले करावे, अन्यथा कोरोनाच्या नियमांचे पालन करून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र समविचारी मंचचे बाबा ढोल्ये, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, नीलेश आखाडे, रघुनंदन भडेकर, राजाराम गावडे, रिकी नाईक, गंधाली सुर्वे, साधना भावे, मनोहर गुरव, श्रेयस सुर्वे, आदींनी दिला आहे.
१० सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. गणेश भक्तांचा हा पर्वणीचा दिवस आहे. लोकप्रतिनिधी प्रशासनाला जाग नाही. महाराष्ट्राभर पसरलेल्या भाविकांची कुचंबणा होता कामा नये यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील असंख्य भाविक या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती समविचारीच्या वतीने देण्यात आली आहे.