रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीवेळी अनेक आश्वासने देणाऱ्या मोदी सरकारने एक वर्षाचा कालावधी पूर्ण केला तरी अद्याप एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. त्याची आठवण करून देण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना आज मंगळवारी निवेदन देण्यात आले.२०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली होती. यात पेट्रोल-डिझेल स्वस्त करणार, महागाई रोखणार, नोकऱ्या देणार, काळा पैसा परत आणणार, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, औषधे स्वस्त करणार, दहशतवादाविरूद्ध कठोर कारवाई करणार, चीनला वठणीवर आणणार, अशा अनेक आश्वासनांचा समावेश होता. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता पदग्रहण करून एक वर्ष पूर्ण झाले तरी यातील एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. किंबहुना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने पावलेही टाकण्यात आलेली नाहीत. यामुळे सामान्य जनतेच्या मनात फसवणुकीची भावना निर्माण झाली असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.मोदी सरकारने एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला आहे. त्यामुळे आतातरी लोकसभा निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले. यात रत्नागिरीचे तालुकाध्यक्ष नाना मयेकर, जिल्हा मीडियाप्रमुख हारीस शेकासन, सुहेल मुकादम, जिल्हा सचिव प्रसाद उपळेकर, दीपक राऊत यांचा समावेश होता. जिल्हाधिकाऱ्यांनी पक्षाच्या भावना निवेदनाद्वारे शासनाकडे पोहोचवण्याची ग्वाही दिली.या निवेदनावर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश कीर, जिल्हा सरचिटणीस सुरेश कातकर, नाथा आढाव, काका तोडणकर, नंदू साळवी, वि. सु. सावंत, पद्माकर पवार, अरूण नेवरेकर, रोहित मयेकर, विनोद गोरे, राजन मोरे, नंदकुमार मोरे, अशोक वाडेकर, शब्बीर खान, साहील भाटकर, विवेक भाटकर, मुकद्दर जमादार, इम्तियाज पटेल, बुरहान वस्ता, आतिफ साखरकर यांच्या स्वाक्षरी आहेत. (प्रतिनिधी)
केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची गांधीगिरी
By admin | Updated: May 27, 2015 01:01 IST