लाेकमत न्यूज नेटवर्क
संदीप बांद्रे/चिपळूण : अनेक वर्षांनंतर येथील उद्यानांना नवरूप आलेले असताना व त्यावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झालेला असताना महापुराने या उद्यानांतील खेळ अर्ध्यावरच संपवला आहे. या जलप्रलयाने चिपळूणमधील सर्वच बालउद्याने अक्षरश: उद्ध्वस्त केली आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी १ कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेले येथील सानेगुरुजी उद्यान पूर्णतः चिखलात रुतले असून, येथील सेल्फी पॉईंट, कारंजे, ज्येष्ठ नागरिक कट्टा, मुलांची खेळणी सर्वांचीच दुर्दशा झाली आहे.
येथील नगर परिषदेने वर्षभर शहरातील उद्याने विकसित करण्यावर अधिक भर दिला होता. त्यासाठी काही सामाजिक संस्था व खासगी कंपन्यांची मदत घेतली होती. त्याआधारे शहरातील काही प्रभागांत बालउद्याने तयार केली होती. शहराच्या मध्यभागी असलेले सानेगुरुजी उद्यान तसेच पाग येथील उद्यान ही दोन्ही उद्याने मोठी आहेत तर अन्य उद्याने छोटी - छोटी आहेत. या सर्व उद्यानांमध्ये नवीन खेळणी, बाकडी, अन्य साहित्य उपलब्ध केले होते. त्यामुळे अनेक वर्षांनंतर शहरातील उद्यानांना एक वेगळे स्वरूप आले होते. मात्र, महापुरात ही उद्याने चिखलमय झाली आहेत.
सानेगुरुजी उद्यानाची २००५च्या महापुरानंतर पुरती वाताहत झाली. डागडुजी, दुरुस्ती करून नगर परिषदेने अनेकवेळा हे उद्यान सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु, उद्यानाचे पूर्ण नूतनीकरण करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनी नॅरोलॅक पेंट्स या कंपनीकडे सीएसआर फंडातून उद्यानाचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला. नॅरोलॅक कंपनीने १ कोटी रुपये खर्च करून सानेगुरुजी उद्यानाचे अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण करून एक सुंदर देखण्या अशा उद्यानाचे लोकार्पण केले. एप्रिल महिन्यात सानेगुरुजी उद्यानाचे लोकार्पण झाले. त्यानंतर काही दिवसातच कोरोनाचा कहर सुरू झाला आणि गर्दीच्या कारणास्तव उद्यान बंद करण्यात आले. ते अद्याप बंदच होते. अशा परिस्थितीत २२ जुलै रोजी आलेल्या महापुराने सानेगुरुजी उद्यान पूर्णतः उद्ध्वस्त केले. या उद्यानाची आजची अवस्था बघता काही महिन्यांपूर्वी दिमाखात लोकार्पण होऊन चिपळूणचे वैभव ठरलेले हेच का ते सानेगुरुजी उद्यान, असा प्रश्न पडावा, असे दृश्य समोर दिसत आहे.
-------------------
उद्यानांच्या डागडुजीची समस्या
चिपळूण शहरातील छोट्या-छोट्या उद्यानांमध्ये झोपाळे, घसरगुंडी व अन्य छोटी-मोठी खेळणे बसवली होती. प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात ही व्यवस्था केल्याने त्या प्रभागातील बच्चे कंपनीसह नागरिकही खुश हाेते. परंतु, महापुरामुळे या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. यातील ८० टक्के उद्याने उद्ध्वस्त झाली आहेत. काही उद्यानांची देखभाल सामाजिक संस्था करत होत्या. त्यामुळे आता या संस्था व कंपन्यांचाही हिरमोड झाला आहे.