रत्नागिरी : तालुक्यातील हरचिरी ग्रामपंचायतीतर्फे अनुसूचित जाती व नवबाैद्ध घटकांच्या विकास कार्यक्रमांतर्गत हरचिरी - कदमवाडी येथे गटाराचे काम करण्यात आले आहे. या कामासाठी ४.९९ लाख खर्च करण्यात आल्याचा फलक लावण्यात आला आहे. मात्र, या कामात गाेलमाल झाल्याचा आराेप येथील ग्रामस्थ शंकर नारायण कदम यांनी केला आहे. त्यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.
हरचिरी ग्रामपंचायतीतर्फे अनुसूचित जाती व नवबाैद्ध घटकांच्या वस्तीचा विकास कार्यक्रमांतर्गत हरचिरी - कदमवाडी नं. १ येथे गटाराचे काम करण्यात आले आहे. या कामावर ४.९९ लाख रुपये खर्ची घालण्यात आले आहेत. मात्र, या कामाचा दर्जा अत्यंत हीन असून, त्याबाबत केलेले करारपत्रही दिशाभूल करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या करारपत्रावर काेणतीही तारीख नसून, साक्षीदारांची नावे घालण्यात आलेली आहेत. पण, त्यावर त्यांच्या सह्या नसल्याचे शंकर कदम यांनी म्हटले आहे. ज्या कामावर लाखाे रुपये खर्च झाले आहेत, ते काम ४० ते ५० हजारापर्यंतच झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. या कामाबाबत ग्रामपंचायतीकडे विचारणा केल्यानंतर काम पू्र्ण झाल्याचा लावण्यात आलेला फलकही काढून टाकण्यात आल्याचे या तक्रार अर्जात म्हटले आहे.
या कामाबाबत नाेव्हेंबर २०२०मध्ये तक्रार करण्यात आली हाेती. त्यानंतर २२ फेब्रुवारी २०२१ रोजी गटविकास अधिकारी यांनी चाैकशीसाठी कार्यालयात बाेलावले हाेते. मात्र, या कामाची चाैकशी प्रत्यक्ष जागेवर हाेणे गरजेचे हाेते. तसे न करता ती नंतर करू, असे सांगण्यात आले. त्यानंतर दाेन महिन्यांचा कालावधी उलटला तरी त्यांच्याकडून कामाची पाहणी करण्यात आलेली नसल्याचे शंकर कदम यांनी सांगितले. गटविकास अधिकारी केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा आराेपही त्यांनी या तक्रार अर्जात केला आहे.
या वाडीसाठी आलेला निधी याच वाडीत खर्च करण्यात यावा, असे त्यांनी म्हटले आहे. गटराच्या कामात उरलेल्या निधीतून वाडीत पथदीप लावावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
.............................
...तर बेमुदत उपाेषण
आपण सामाजिक बांधिलकी म्हणून गेले ८ - ९ महिने शासनाकडे याबाबत दाद मागत आहोत. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या कामाची सखाेल चाैकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शंकर कदम यांनी या तक्रार अर्जात केली आहे. याबाबत याेग्य ती कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपाेषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.