रत्नागिरी : सॅफरॉन इंटरनॅशनल हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने रत्नागिरीकरांची फसवणूक केल्याची आणखी ३५ प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यामुळे या कंपनीने केलेल्या फसवणुकीची रक्कम आता तीन कोटींवर पोहोचली आहे. याप्रकरणी रत्नागिरीत अटक केलेल्या दोन संशयित महिला आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने २७ जूनपर्यंत वाढ केली आहे, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप मिसर यांनी दिली. सॅफरॉनने रत्नागिरीत कार्यालय थाटून गेल्या आठ वर्षांच्या काळात चांगला जम बसविला. लोकांकडून विविध योजनांत पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवित लोकांना भुलविले. त्यामुळे शेकडो लोकांनी या कंपनीत लाखो रुपयांची गूंतवणूक केली. या प्रकरणाचे बिंग अखेर गुंतवणुकदारांनीच फोडले. गुन्हा दाखल झाल्यानंतर ऐश्वर्या गावकर व रश्मी मांडवकर या दोन संशयित महिला आरोपींना तीन दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. त्यांना आज, सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांच्या पोलीस कोठडीत २७ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणात अजून बऱ्याच तक्रारी दाखल होणार आहे. सॅफरॉनचा सर्वेसर्वा शशिकांत राणे अजून मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून, पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. उद्या, मंगळवारी त्याची पोलीस कोठडी संपत असल्याने रत्नागिरी पोलिसांकडे त्याचा ताबा मिळण्याची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
‘सॅफरॉन’ची आणखी ३५ प्रकरणे उघड
By admin | Updated: June 24, 2014 01:41 IST