राजापूर : कोरोना संकट काळात आपलाही खारीचा वाटा, या भावनेतून राजापूर येथील कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखेतर्फे धारतळे कोविड सेंटरच्या उभारणीसाठी एक लाखाचा मदत निधी देण्यात आला़
या कोविड सेंटरच्या शुभारंभावेळी खासदार विनायक राऊत, तहसीलदार प्रतिभा वराळे उपस्थित हाेते़ यावेळी कोविड सेंटरच्या अत्यावश्यक आरोग्य वस्तूंकरिता संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बावकर यांच्या हस्ते १ लाखाचा धनादेश देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीपक नागले, सुरेश बाईत, सहसचिव श्रीकांत राघव, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर उपस्थित होते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने ग्रामीण ठिकाणी विविध विभागातील आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे़ आपल्या शाखेच्या मागणीनुसार जिल्हा परिषद सदस्य व ग्रामीण शाखेचे कार्यकारिणी सदस्य दीपक नागले यांच्या पाठपुराव्यामुळे धारतळे आरोग्य केंद्र येथे कोविड सेंटरला मंजुरी मिळाली होती. त्यांच्या या कार्यात संघाचे योगदान म्हणून हा मदत निधी देण्यात आला़