राजापूर : कोविडची तिसरी लाट तालुक्यात पसरू नये म्हणून व तालुक्यातील नागरिकांचा गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी दोन डोस घेतले आहेत का, याची माहिती घेतली जाणार आहे. तसेच त्यांची ७२ तासांतील कोविड चाचणी झाली का, याची तपासणी करण्यात येणार आहे. याकरिता सागवे, रेल्वेस्थानक, अणुस्कुरा तपासणी नाका व राजापूर आगार येथे तपासणी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. निखिल परांजपे यांनी दिली.
राजापूर पंचायत समितीची सभा नूतन सभापती करूणा कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला उपसभापती अमिता सुतार, गटविकास अधिकारी सागर पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य व सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या सभेत तालुक्यातील एस. टी. फेऱ्या सुरू करण्यावरून खडाजंगी झाली. अखेर गणेशात्सवानंतर या संदर्भात बैठक घेण्याचे ठरवून या विषयावर पडदा टाकण्यात आला. शासन परिपत्रकानुसार तालुक्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तालुक्यात सद्यस्थितीत १० शाळा सुरू आहेत. मात्र, अन्य शाळा सुरू करताना गणेशोत्सवानंतर तालुक्यातील कोविडचा आढावा घेत शाळा सुरू करण्याचा सूचना देण्यात आल्या. तसेच तालुक्यात अडीच हेक्टर जागा उपलब्ध झाल्यास अविष्कार केंद्र उभारण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. यावेळी अभिजीत तेली यांनी शासकीय जागांचा शोध घेत अविष्कार केंद्रासाठी जागा उपलब्ध करावी, अशी सूचना मांडली.
कोविडच्या कालावधीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी न करता त्यांना पुढे कायम ठेवण्यात यावे तसेच कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कोविड सेंटर व रुग्णालये बंद न करता कार्यान्वित ठेवा, असे आदेश यावेळी देण्यात आले. तसेच तालुक्यातील खारलॅण्डच्या बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
---------------------
मुदतीआधीच वीज खंडित
विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी सर्वसामान्यांसाठी काम करत नसून स्वार्थापोटी काम करत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. विद्युत बिल भरण्याची अंतिम मुदत दि. २ सप्टेंबर असताना संबंधित ग्राहकाने बिल भरले नाही म्हणून अंतिम तारखेच्या आधीच विद्युत पुरवठा खंडित केल्याची घटना ओणी येथे घडल्याचे सदस्य प्रतीक मठकर यांनी सांगितले.
------------------
विद्युत पुरवठा खंडित करु नये
तालुक्यातील आपला वसुलीचा रेशो खाली येऊ नये म्हणून अधिकारी ग्राहकांकडून सक्तीची वसुली करत आहेत, असा आरोप करण्यात आला. ज्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे अशा ग्राहकांचा विद्युत पुरवठा त्वरित सुरळीत करावा व गणेशोत्सव कालावधीमध्ये ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करु नये, असे आदेश देण्यात आले.