रत्नागिरी : रत्नागिरी, मुंबईसह राज्याच्या अन्य काही जिल्ह्यांतील लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून खळबळ माजवणाऱ्या सॅफरॉन इंटरनॅशनल हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेडचा मुख्य सूत्रधार शशिकांत राणे रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात येण्यास अजून काही वेळ लागणार आहे. मात्र, रत्नागिरीत त्याच्याविरोधातील तक्रारींची संख्या आता दिडशेवर गेली असून, फसवणुकीची रक्कम चार कोटीपर्यंत पोहोचली आहे.याबाबत माहिती देताना रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप मिसर यांनी सांगितले की, शशिकांत राणे याला मुलंूंड पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचा ताबा मिळविण्याचा आमचा प्रयत्न होता. परंतु त्या दरम्यान ठाणे जिल्ह्यातीही सॅफरॉनचे अनेक कारनामे उघड होत असून, त्याप्रकरणी ठाणे पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे ठाणे पोलिसांनी राणेचा ताबा घेतला आहे. त्याचा ताबा येत्या काही दिवसांत रत्नागिरी पोलीस निश्चितपणे घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज (बुधवार) दिवसअखेर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात सॅफरॉनकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांच्या तक्रारींची संख्या वाढली आहे. लाखो रुपये दामदुप्पट योजनेंतर्गत गुंतवून घेतल्यानंतर या कंपनीने पैसे न देता पोबारा केला होता. स्थानिकांनीच पोलिसांत गुन्हे दाखल केल्याने आता याप्रकरणी फसवणूक झालेले अनेक गुंतवणूकदार पुढे येत आहेत. त्यामुळे आज ही संख्या १५० च्या पुढे गेली आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या रकमेचा आकडा वाढतच चालला आहे. आज अखेर फसवणूक झालेली रक्कम ही ३ कोटी ९६ लाख रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचे मिसर यांनी सांगितले. याप्रकरणी फसलेल्या गुंतवणूकदारांच्या अजून बऱ्याच तक्रारी येत असून, त्या नोंदविण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले. सॅफरॉन या कंपनीने रत्नागिरीत प्रवेश केल्यानंतर अत्यंत सावधपणे ग्राहक हेरून दुबई पर्यटनाचे गाजर दाखविले. त्यानंतर त्या दौऱ्याचे पैसेही नंतर परत केले व या लोकांनाच आपल्या पैसे दामदुप्पट योजनेत अडकवले. या कंपनीच्या रत्नागिरी कार्यालयात दोन महिला कर्मचारी कार्यरत होत्या. त्यांनी दामदुप्पट योजनेच्या भूलभुलैय्यात लोकांना ओढले. याप्रकरणी या दोन्ही तत्कालिन कर्मचारी महिलांना अटक झाली. २७ जूनपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सॅफरॉन फसवणूक झाली चार कोटींची
By admin | Updated: June 26, 2014 00:22 IST