रत्नागिरी : अन्नसुरक्षा योजना लाभार्थी यादीसाठी केशरी रंगाच्या शिधापत्रिकाधारकांमधून हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडे १४,२५१ हरकती प्राप्त झाल्या असून, त्यावर झालेल्या सुनावणीत यापैकी १२१९ लाभार्थ्यांचा यादीत समावेश झाला आहे. ११,१०९ हरकती नाकारण्यात आल्या आहेत. उर्वरित १९२३ हरकतींवर अद्याप निर्णय व्हायचा आहे. या योजनेत दोन गटांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारक, तर दुसरा प्राधान्य गट यात एपीएल म्हणजेच केशरी कार्डधारकांचा समावेश होता. जिल्ह्यात सध्या बीपीएल शिधापत्रिकाधारक ७२६४० आणि अंत्योदयधारक४२७९३ असे एकूण १,१५,४३३ या योजनेचे लाभार्थी आहेत. पण केशरीकार्डधारक २,५४,८५९ आहेत. मात्र, या गटासाठी ग्रामीण भागाकरिता ४४ हजार, तर शहरीकरिता ५९ हजार रूपये उत्पन्नाची अट घालण्यात आलेली आहे. त्यातही ग्रामीण भागातील ७६.३२ टक्के आणि शहरी भागातील ४५.३४ टक्के इतक्या लोकांना लाभ द्यायचा होता. यामुळे काही ठिकाणी उत्पन्नाच्या अटीत बसणाऱ्यांनासुद्धा या योजनेपासून वंचित राहावे लागले होते. तर अधिक उत्पन्न असूनही काहींचा समावेश लाभार्थींमध्ये करण्यात आला होता. दि. १ फेब्रुवारी २०१४ पासून या योजनेला प्रारंभ झाला असला तरी यावर तोडगा म्हणून जानेवारी २०१४ पासून हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार जूनअखेर एकूण १४,२५१ हरकती पुरवठा विभागाकडे दाखल करण्यात आल्या. यापैकी १३,५१६ वर सुनावणी घेण्यात आली. ८३०५ वर निर्णय घेण्यात आला. ९२२ अद्याप प्रलंबित आहेत. अंतिम निर्णय घेतलेल्या हरकतींपैकी १२१९ जणांचा लाभार्थींमध्ये समावेश झाला आहे. त्यांना आता अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे. ११,१०९ हरकती अमान्य करण्यात आल्या आहेत. उर्वरित ११८८ वर निर्णय घेणे बाकी आहे. (प्रतिनिधी)-जिल्ह्यातून १४ हजार २५१ हरकती दाखल.-लाभार्थींच्या यादीत १२१९ नावांची नव्याने भर.-जिल्ह्यात बीपीएल शिधापत्रिकाधारक ७२६४० आणि अंत्योदयधारक ४२७९३ असे एकूण १,१५,४३३ योजनेचे लाभार्थी.-११८८ हरकतींवर निर्णय बाकी.-केशरीकार्डधारक गटासाठी ग्रामीण भागाकरिता ४४ हजार, तर शहरी भागाकरिता ५९ हजार रूपये उत्पन्नाची अट.
हरकतींच्या गर्दीत अडकली अन्नसुरक्षा
By admin | Updated: August 6, 2014 00:00 IST