लाेकमत न्यूज नेटवर्क
संदीप बांद्रे/चिपळूण : वर्षभराच्या रोजीरोटीचा आधार असलेली शेती महापुरात वाहून गेली. गोठा कोसळला व जनावरेही मृत पावली. अशावेळी शासनाकडून तातडीची मदत सोडाच मोफत धान्य मिळत नसल्याने पूरग्रस्त शेतकरी अडचणीत आला आहे. ज्यांच्या घरात पाणी गेले आहे, त्यांना मोफत अन्य मिळतेय. मात्र, पिढ्यानपिढ्या शेती उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्याला अन्नधान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
महापुरात तालुक्यातील ११ हजारांहून अधिक कुटुंब बाधित झाली. मात्र, तेवढ्याच पटीत येथील शेतकरी बाधित झाला आहे. बहरलेली भातशेती वाहून गेली, तर काही ठिकाणी शेत गाळात नष्ट झाले आहे. शेताचे बांधच दिसेनासे झाले आहेत. शेत शोधायचे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यातच काहींचे गोठे वाहून गेले, तर त्यातील जनावरेही मृत झाली. अशावेळी शासनाकडून काहीतरी मदत होईल, अशी अपेक्षा असताना शेतकऱ्याची निव्वळ चेष्टा झाली आहे. तातडीची मदत सोडाच मोफत धान्यदेखील मिळालेले नाही. ज्यांनी पिढ्यानपिढ्या कष्ट करून पिके घेतली व इतरांची भूक भागवली त्याच शेतकऱ्यांवर आता उपाशी राहण्याची वेळ आली आहे.
सध्या पूरग्रस्त भागात शासनाकडून मोफत धान्य दिले जात आहे. दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ, पाच किलो तूरडाळ, पाच लीटर रॉकेल असे पुरवले जात आहे. साहजिकच त्याचा लाभ पूरग्रस्त ११ हजार बाधित कुटुंबीयांना होणार आहे. मात्र, त्या व्यतिरिक्त असलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या या योजनेचा कोणताही लाभ होत नाही. आज, उद्या शासन शेतकऱ्यांचा विचार करेल, असे वाटत होते. मात्र, कोकणातील शेतकरी असंघटित असल्याने शासनाच्या या योजनेपासून वंचित राहावे लागले आहे.
----------------------
महापुरात घरं, दुकानं वाहून गेले असतानाच शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना आजतागायत कोणतीही मदत मिळालेली नाही. तेव्हा शासनाने किमान मोफत धान्य देणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली असल्याने व मृत झाले असल्याने त्यांना जनावरे खरेदीसाठी जिल्हा बँकेतून पूरग्रस्त व्यापाऱ्यांप्रमाणेच पाच टक्के व्याजाने कर्ज देणे गरजेचे आहे.
- अभिमन्यू बुरटे, गोवळकोट, चिपळूण.
---------------------
पूरग्रस्त भागासाठी मोफत धान्य वाटपाबाबत २४ जुलै रोजी शासनाकडून आलेल्या परिपत्रकानुसार वाटप केले जात आहे. त्यामध्ये घरामध्ये पुराचे पाणी गेलेल्या पूरग्रस्तांना हे धान्य वाटप करण्याच्या सूचना आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोफत धान्य दिलेले नाही.
- मनोज पवार, पुरवठा अधिकारी, चिपळूण.