रत्नागिरी : येथील राष्ट्रसेविका रेणुका प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण येथील सात पूरग्रस्त भगिनींनी स्वत:चा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी घरघंटी दिल्या, तसेच सात जणींना व्यवसायासाठी आर्थिक सहकार्य केले. कार्यवाहिका नेहा जोशी यांनी संथ्येच्या कार्याबद्दल माहिती दिली.
बाजारपेठा सजल्या
रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या आहेत. रत्नागिरी शहरातील रामआळी, मारूतीआळी, मारूती मंदिर आदी ठिकाणी गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू व साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. साहित्य खरेदीसाठी नागरिकही आता हळूहळू बाजारात येऊ लागले आहेत.
नवीन प्रयोग करावेत
रत्नागिरी : तालुक्यात प्रामुख्याने आंबा व काजू या हंगामी बागायती शेतीबरोबर इतर नगदी पिकांकडेही शेतकऱ्यांनी वळून आपला आर्थिक विकास साधला पाहिजे. हंगामी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शाश्वत शेती केली पाहिजे, असे प्रतिपादन पंचायत समिती उपसभापती उत्तम सावंत यांनी केले.
कर्मचाऱ्यांचा सत्कार
मंडणगड : उद्योजक दीपक घोसाळकर यांनी नगरपंचायतीत कार्यरत असलेल्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा कोविड काळात बजावलेल्या विशेष कार्याबद्दल सत्कार केला. याचबरोबर भिंगळोली येथील कोविड रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप केले. काेराेना काळात कार्यरत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे काैतुक करण्यासाठी, त्यांच्या पाठीवर काैतुकाची थाप मारण्यासाठी या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.
लॅबचा शुभारंभ
दापोली : दापोलीतील ज्ञानदीप विद्यामंदिरातर्फे कै. संतोषभाई फुलचंद मेहता यांच्या जयंतीनिमित्त अटल लॅब अद्ययावत प्रयोगशाळेचे उद्घाटन २ सप्टेंबर रोजी शहरातील डीएनएस बँक सभागृहात आर्किटेक्ट इंजिनिअर संदीप जोशी व इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर तुषार जोशी यांच्याहस्ते होणार आहे.