लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : येथे दि. २२ व २३ जुलैला आलेल्या महापुरात व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. शासनाने व्यापाऱ्यांना तातडीचे ५० हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर केली होती. मात्र महिना उलटला तरी अद्याप ही मदत प्राप्त झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गुरुवारी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांची भेट घेतली. शासनाकडून व्यापाऱ्यांना आठ दिवसांत आर्थिक मदत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाभयंकर पुरामुळे समस्त चिपळूणकरांचे संपूर्ण जीवनच उद्ध्वस्त झाले आहे. तसेच व्यापाऱ्यांचेही अतोनात नुकसान होऊन अक्षरशः व्यापारी संपूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. त्यातच सरकारने जाहीर केलेली मदतही अजून सव्वा महिना उलटून गेला तरीही व्यापाऱ्यांना मिळालेली नाही. शासनाकडून पंचनामे होऊनही आता जवळपास महिना होऊन गेला आहे. इतक्या भयंकर परिस्थितीमध्येही ह्या उद्ध्वस्त व्यापाऱ्यांनी जुळवाजुळव करून शासनाच्या मागणीनुसार शक्य ती कागदपत्रेही आपणाकडे सुपुर्द केलेली आहेत. तरीही अजूनही प्रशासनाकडून मदत देण्याच्या दृष्टीने काहीच हालचाल दिसत नाही. तरी ही सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून व्यापाऱ्यांना त्वरित मदत मिळावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने खासदार पवार यांच्याकडे केली तसेच अन्य प्रश्न व व्यथा मांडण्यात आल्या.
यावर खासदार पवार यांनी तातडीने पुनर्वसन विभागाचे सचिवा असिम गुप्ता यांच्याशी चर्चा केली. यावेळी वाशिष्ठी नदीला वारंवार येणारे पूर याबाबत ग्लोबल चिपळूण टुरिझमचे श्रीराम रेडीज व शहानवाज शहा यांनी खासदार शरद पवार व अजित पवार यांच्यासमोर महापुराची कारणे पीपीटीद्वारे सादर केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या आठ दिवसांत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घेण्याचे जाहीर केले. आमदार शेखर निकम यांच्यासोबत या शिष्टमंडळामध्ये व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शिरीष काटकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, युवा कार्यकर्ते अक्षय केदारी, श्रीराम रेडीज, शहानवाज शहा आदी उपस्थित होते.