खेड : महापुरामुळे जिल्ह्यात ज्या ठिकाणी पुरामध्ये रेशनकार्ड गहाळ झाली असतील, तेथे लाभार्थ्यांना रेशनकार्डची दुय्यम प्रत, नुकसान पंचनाम्याची प्रत, रेशन दुकानदार यांच्याकडील ई-रजिस्टरचा उतारा ही कागदपत्रे पाहून तातडीने देण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले आहेत. याबाबत मानवाधिकार असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली होती.
अतिवृष्टीत शासकीय कागदपत्रांची हानी झाली आहे. त्यामुळे लोकांना अशा कागदपत्रांच्या दुय्यम प्रती मिळणे आवश्यक आहे. त्यामध्ये रेशनकार्डचाही समावेश आहे. ज्या भागात पुरामध्ये कागदपत्रे गहाळ झाली असतील, अशा ठिकाणी संबंधित कार्डधारकांना रेशनकार्डची दुय्यम प्रत देण्याबाबत मानवाधिकार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्राने जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. या पत्राचा संदर्भ देऊन जिल्हाधिकारी यांच्या सूचनांनुसार दि. ९ ऑगस्ट रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पूरग्रस्त रेशनकार्डधारकांना तलाठी यांच्याकडील पंचनाम्याची प्रत, रेशन दुकानदार यांच्याकडील ई-रजिस्टरचा उतारा आदी कागदपत्रे पाहून रेशनकार्डची दुय्यम प्रत देण्यात यावी, असे लेखी आदेश संबंधित पूरग्रस्त भागात दिले आहेत. सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष जाधव यांच्या सहीने दिलेल्या या आदेशाने खेड व चिपळूणसह जिल्ह्यातील अन्य भागातील पूरग्रस्त भागात नागरिकांना रेशनकार्डची दुय्यम प्रत सहज उपलब्ध होणार आहे.