लॉकडाऊनमुळे कडवई बाजारपेठेत शुकशुकाट पसरला हाेता.
लाेकमत न्यूज नेटवर्क
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई परिसरात मागील तीन दिवसांत १९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने येथील स्थानिक प्रशासनाने शनिवारपासून बुधवारपर्यंत पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात अत्यावश्यक सेवेसह सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. जनतेची गैरसोय होत असली तरी रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे सरपंच विशाखा कुवळेकर यांनी सांगितले.
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे आठ दिवसांपूर्वी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर दोनच दिवसांत संबंधित रुग्णाची आई मृत्यू पावली. या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आलेली नव्हती, त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
त्यानंतर परिसरातील ग्रामस्थांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यात दोनच दिवसांत कडवई परिसरातून एकूण १९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, तत्काळ परिसरातील व्यापाऱ्यांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला सरपंच विशाखा कुवळेकर, उपसरपंच दत्ताराम ओकटे, ग्रामविस्तार अधिकारी किरण भुसारे, पोलीस पाटील रमेश तुळसणकर यांच्यासह सर्व व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत एकमताने औषधांची दुकाने व दवाखाने वगळता अत्यावश्यक सेवेसह सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. काही ग्रामस्थ अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नाहक फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे सरपंच विशाखा कुवळेकर यांनी सांगितले. या कडक लॉकडाऊनमुळे नेहमी गजबजलेला असणारा कडवईचा परिसर ओस पडला हाेता. शनिवारपासून परिसरातील रिक्षा वाहतूकही बंद करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी दिली. अत्यावश्यक असल्यास नियमांचे पालन करून दोन सीटसह रिक्षा वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.