रत्नागिरी : सातत्याने जिल्ह्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून येथील मासळी गाळून नेणाऱ्या परप्रांतीय मासेमारी नौकांची दादागिरी सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मच्छिमार त्रस्त झाले आहेत. या संतापाचा उद्रेक भर समुद्रात झाला, तर त्याला मत्स्यव्यवसाय खात्यासह संबंधित चारही विभाग जबाबदार राहतील, असा इशारा रत्नागिरीतील मच्छिनौका मालक व मासळी व्यावसायिकांनी आज, शुक्रवारी दिला.रत्नागिरीतील मच्छिमारांच्या अनेक समस्यांबाबत संबंधित खात्याचे अधिकारी, मच्छिमार यांची बैठक पत्रकारांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहात झाली. मत्स्य विभागाचे काही अधिकारीच संभ्रम निर्माण होईल, अशी माहिती प्रसारमाध्यमांना देत असल्याच्या तक्रारी आल्याने, आमने-सामने ही बैठक आयोजित केली होती. यावेळी मच्छी व्यावसायिकांनी सांगितले की, गेल्या आठ दिवसांपूर्वी रत्नागिरीच्या सागरी क्षेत्रात परराज्यातील दोनशेपेक्षा अधिक मच्छिमारी नौका एकाचवेळी रांगेत राहून मच्छिमारी करीत होत्या. किनारपट्टीपासून साडेबारा नॉटिकल मैलाच्या आत येऊन या नौकांनी नियमभंगही केला. रत्नागिरीच्या सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात राणा मासा आला होता. मात्र गोवा, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ राज्यातून येथे घुसखोरी केलेल्या या दोनशेवर मच्छिमारी नौकांनी चार दिवसात राणा मासळी गोळा केली आणि निघून गेल्या. या राणा मासळी रत्नागिरीचा महिनाभराचा मासळी हंगाम चालला असता, असेही रत्नागिरीच्या मच्छिमारांंनी यावेळी स्पष्ट केले. मिरकरवाडा बंदरात असलेल्या ड्रेझरने आल्यापासून आतापर्यंत, एक घमेलेही गाळ उपसलेला नसल्याचा दावा करीत, मत्स्य खात्याच्याच एका अधिकाऱ्याने हा ड्रेझर येथून न्यावा, अशी मागणी करणारे पत्र मेरीटाईम बोर्डालाच पाठविले आहे. त्यावरूनही जोरदार वादंग झाला. अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती मांडल्याचा दुजोराही मच्छिमारांनी दिला. मात्र, हा ड्रेझर हलविण्याच्या मागणीचा अधिकार येथील अधिकाऱ्यांना नाही, त्यांनी हा ड्रेझर कार्यरत करावा, अशी सूचना करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)स्पीड बोटींचा पाठलाग करणार कसा ?घुसखोरी करून मच्छिमारी करणाऱ्या परराज्यातील स्पीड बोटींचा पाठलाग करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडे साधी लाकडी नौका आहे. ही नौका कसा पाठलाग करणार ? त्यासाठी स्पीड बोटीची व्यवस्था करण्याची मागणी आहे.
मच्छिनौकांची दादागिरी सुरूच
By admin | Updated: January 16, 2015 23:41 IST