रत्नागिरी : मनरेगाअंतर्गत ‘लखपती शेतकरी’ या उपक्रमांतर्गत एक मॉडेल गाव म्हणून जिल्ह्यातील पहिली कार्यशाळा रत्नागिरी तालुक्यातील वळके गावात पार पडली.
या कार्यशाळेला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर, सभापती संजना माने, गटविकास अधिकारी बी. टी. जाधव, उपसभापती उत्तम सावंत व अन्य उपस्थित होते.
कृषी अधिकारी तथा जिल्हा मोहीम अधिकारी सुहास पंडित यांनी मनरेगा अंतर्गत विविध कामे घेतल्यामुळे कोणता, कसा फायदा होतो, हे उदाहरणासहीत सांगितले. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अभिजित कसालकर यांनी शेळी, मेंढी, कोंबडी पालन, गोठे आदी माहिती दिली. पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी विजय पोकळे यांनी लखपती शेतकरीबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. जाखड यांनी गावामध्ये योजनेत समाविष्ट असलेली व अन्य नवनवीन कामे सुचवावीत, त्याला जिल्हा समितीमार्फत मंजुरी देता येईल, असे स्पष्ट केले. तालुक्यातील अन्य ४० गावांमध्ये प्रत्येकी १० कोटींचे लेबर बजेट तयार करून कामे घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले.