चिपळूण : आतापर्यंत तालुक्यातील टंचाईग्रस्त आठ गावांनी टँकरची मागणी केली आहे. या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी लक्ष घातले असून, त्यांच्या प्रयत्नाने गुरुवारी धामणवणे येथे पहिला खासगी टँकर मदतीसाठी धावला.
शहरालगतच्या धामणवणे गावात सहा वाड्यांकरिता अनेक वर्षांपासून पाणीप्रश्न निर्माण होत आहे. उष्म्यामुळे हा प्रश्न प्रखरतेने जाणवू लागला आहे. या गावांचा तालुक्यातील टंचाई आराखड्यात समावेश नसल्याने त्यामुळे त्यांना प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात नाही.
याविषयी धामणवणे गावचे सरपंच सुनील सावंत यांनी ग्रामस्थांसह आमदार निकम यांची भेट घेत चर्चा केली होती. त्यानुसार या गावांकरिता खासगी स्वरूपातील टँकरची उपलब्धता व्हावी, यासाठी मुंबई-गोवाचे चौपदरीकरणातील ठेकेदार चेतक कंपनीच्या व्यवस्थापनास निवेदन दिले होते. अखेर या निवेदनाची दखल घेऊन कंपनीचा पहिलाच खासगी टँकर या टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी गुरुवारपासून सुरू झाला आहे. या टँकरद्वारे हलदांबा तसेच बौद्धवाडीतील ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यात आला. टँकर गावात येताच त्याचे विशेष स्वागत सरपंच सावंत यांनी केले. ग्रामपंचायत सदस्या अंजना उंडरे, रिया सावंत, सुभाष जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष काशिराम शिगवण, शंकर उंडरे, दिनेश उंडरे, अशोक उदेग, सुमेध जाधव, सुरेश उंडरे, आदींनी आमदार निकम व कंपनी व्यवस्थापकांचे आभार मानले.