नेटवर्कमुळे धान्य पुरवठ्यात समस्या
राजापूर : रास्त दर धान्य दुकानांतून पॉस मशीनच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने धान्य देण्यात येते. मात्र, नेटवर्कअभावी लाभार्थ्यांचे थम व्हेरिफाय होत नसल्यामुळे धान्य पुरवठ्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे गरजू लाभार्थी धान्यापासून वंचित राहात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
रस्ता दुरूस्ती मागणी
खेड : तालुक्यातील माैजे जैतापूर शाळा क्रमांक १ ते कावणकरवाडी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या मार्गावर एस. टी. सेवा बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या मार्गाची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रामचंद्र आखाडे यांनी केली आहे. गेल्या १५ वर्षांत या मार्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने दुरूस्ती झालेली नाही.
खड्डा तत्काळ भरण्याची मागणी
राजापूर : सागरी महामार्गावरील जैतापूर खाडीपुलावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्डयांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी संपर्क अध्यक्ष भूषण विचारे यांनी आपले सरकार तक्रार निवारण पोर्टलवर तक्रार केली हाेती. त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.
मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत
खेड : तालुक्यातील घेरारसाळगड - निमणी मार्गावर भगदाड पडून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. मात्र, आमदार योगेश कदम यांनी याची दखल घेत प्रशासनाला सूचना दिल्यानंतर मार्ग अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.