रत्नागिरी : चांदोली अभयारण्यासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, अशा संगमेश्वर तालुक्यातील गोठणे येथील ४९ कुटुंबांना जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी भूखंडाचे वाटप करण्यात आले. चांदोली अभयारण्य प्रकल्पात गोठणे येथील ग्रामस्थांच्या जमिनी गेल्या आहेत. या प्रकल्पग्रस्तांपैकी काही कुटुंबांचे कोल्हापूर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. ४९ कुटुंबांचे नजिकच्या हातीव येथे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, संपादित केलेल्या ८.८२ हेक्टर जागेवर ८२ भूखंड तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी प्रस्ताव दाखल केलेल्या ४९ कुटुंबांना चिठ्या काढून भूखंडांचे वाटप करण्यात आले. कुटुंबातील सदस्य संख्येनुसार ३७०, ५५५ आणि ७४० चौरस मीटर क्षेत्राचे भूखंड देण्यात आले आहेत. या प्रकल्पग्रस्तांच्या आधीच्या जमिनीचा आणि घरे, झाडे यांचा मोबदला शासन नियमानुसार देण्यात आला आहे. यावेळी पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, संगमेश्वरच्या तहसीलदार वैशाली माने, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता लोखंडे, हातीवचे सरपंच, पोलीसपाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. गोठणेवासीयांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून हातीव येथील गावठाणामध्ये १ कोटी ९२ लाख एवढा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून या ग्रामस्थांना वीज, पाणी, अंतर्गत रस्ते, समाजमंदिर, स्मशानभुमीशेड आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. सध्या या गावठाणात शाळेच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)प्रकल्पग्रस्तांना शासनाकडून त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे. त्याचबरोबर ते सध्या राहत असलेल्या हातीव येथे आता त्यांना अधिकृत भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. या ग्रामस्थांनी आता या भूखंडावर घरे बांधण्यास सुरूवात करताच १० हजार रूपयांची आर्थिक मदत शासनाकडून करण्यात येणार आहे. - नितीन राऊत, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभागप्रकल्पग्रस्तांपैकी काही कुटुंबांचे कोल्हापूर येथे पुनर्वसन.संपादित केलेल्या ८.८२ हेक्टर जागेवर ८२ भूखंड तयार.प्रस्ताव दाखल केलेल्या ४९ कुटुंबांना चिठ्या काढून भूखंडांचे वाटप.कुटुंबातील सदस्य संख्येनुसार ३७०, ५५५ आणि ७४० चौरस मीटर क्षेत्राचे भूखंड.नियमानुसार मोबदला.
अखेर ४९ प्रकल्पग्रस्तांना भूखंडवाटप
By admin | Updated: October 21, 2015 21:31 IST