खेड : तालुक्यातील रघुवीर घाटाच्या पुढे सातारा जिल्ह्यातील कंदाटी खोऱ्याला जोडणाऱ्या रस्त्यात अतिवृष्टीमुळे दरडी काेसळून मार्ग बंद झाला हाेता. त्यामुळे या मार्गावरील एस. टी. वाहतूक बंद ठेवण्यात आली हाेती. या भागातील ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्त्यातील दरड बाजूला केली. त्यामुळे या मार्गावरील खेड - अकल्पे बस पुन्हा सुरू झाली आहे.
तालुक्यातील रघुवीर घाट पार केल्यानंतर सुमारे पाच किलाेमीटर पुढे सातारा जिल्ह्यातील शिंदी, वळवण, चकदेव आदी गावांना येथील आगारातून थेट एस. टी. बस सोडण्यात येते. कंदाटी खोऱ्यातील या गावातील जनता खेड शहरातील बाजारपेठेवर अवलंबून आहे. बाजार, वैद्यकीय सुविधांकरीता खेड शहरावर या खोऱ्यातील ग्रामस्थ अवलंबून आहेत. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रघुवीर घाटात दरडी कोसळल्याने हा मार्ग बंद झाला होता तर घाटाच्या पुढे सातारा जिल्ह्याला जोडणारा पाच किलाेमीटर रस्ता नादुरुस्त झाला होता. यामुळे खेड एस. टी. आगाराने या मार्गावरील वाहतूक बंद केली होती.
मात्र, शिंदी, वळवण, चकदेव या गावांतील ग्रामस्थांनी एकत्रित येत श्रमदानातून रघुवीर घाटाच्या पुढे असलेला सातारा जिल्ह्यातील पाच किलाेमीटरचा मार्ग दुरुस्त केला. खेड आगारातील एस. टी. च्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून या मार्गावर मंगळवारपासून एस. टी.ची वाहतूक पूर्ववत केली. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी सदानंद मोरे, चंद्रकांत मोरे, हेमश्चंद्र मोरे, मनोज मोरे, रामचंद्र जंगम, सीताराम जंगम, संतोष जंगम, कृष्णा जाधव, प्रकाश जाधव, सावजी उत्तेकर, शांताराम जंगम यांच्यासह महिला व ग्रामस्थांनी सहभाग घेतला.