जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याचे चित्र दिसू लागल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळू लागला आहे. मात्र, यामुळे काही नागरिकांमध्ये बेफिकीरी वाढू लागली आहे. काहीजण आता मास्क न वापरताच सार्वजनिक ठिकाणी फिरू लागले आहेत. तसेच माॅल, विविध दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागल्याने सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडू लागल्याचे चित्र आहे.
खेड तालुक्यातील लोटे विभागात कोरोनाबाधित रुग्णांनी आतापर्यंत उच्चांक गाठला असून, ही संख्या १,१२१ इतकी झाली आहे. या विभागात आतापर्यंत ३० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत केवळ एक रुग्ण सक्रिय आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट झाल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. लोटे विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. तोही आटोक्यात आणण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.