चिपळूण : गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोवळकोट कदम बौद्धवाडी येथील घरांच्या स्थलांतराबाबत अजून कोणताही निर्णय झाला नसल्याने १५ कुटुंबांना असलेला धोका कायम आहे. गोविंदगड किल्ला परिसरात दिवसेंदिवस भेगा रुंदावत आहेत. १५ दिवसांपूर्वी गोवळकोट कदम बौद्धवाडीचे पुनर्वसन करण्याबाबत तत्कालीन तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांनी सर्व बाबींचा अभ्यास करून येथील एक शासकीय जागा निश्चित केली होती. यासाठी शासकीय पातळीवरही हालचाली झाल्या; मात्र अद्याप या वाडीचे स्थलांतर झालेले नाही. गोवळकोट येथील गोविंदगड किल्ला परिसरात भेगा पडल्या असून, आजूबाजूचा परिसरही खचत आहे. पुनर्वसनाचा प्रश्न जलदगतीने सुटावा यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, खासदार रामदास आठवले यांच्याकडेही पत्रव्यवहार केला आहे. मात्र, ग्रामस्थांना स्थलांतराची नोटीस पाठविली जात आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था आहे. चिपळूण तालुका आरपीआयतर्फेही प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांना निवेदन दिले आहे. (वार्ताहर)
पंधरा कुटुंबांना धोका
By admin | Updated: July 14, 2015 01:31 IST